Published on
:
04 Feb 2025, 3:55 pm
Updated on
:
04 Feb 2025, 3:55 pm
नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या लोकांवर आपल्याच लोकांकडून आरोप करायला लावायचे. एकंदरीत असे दिसते की, भाजपचे हे षडयंत्र तर सुरू नाही ना? चौकशी झाली पाहिजे. लवकरात लवकर सीआयडीने अहवाल दिला तर यात नेमके काय ते पुढे आहे ते येईल अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते,माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. एकप्रकारे देशमुख यांनी भाजपला लक्ष्य करताना अजितदादा गटाशी आपली जवळीक स्पष्ट केली.
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केल्यासंदर्भात माध्यमांशी ते बोलत होते. याविषयाची याचिका नागपूर खंडपिठात दाखल आहे. त्यामुळे यावर बोलणे योग्य नाही. आरोपाची दखल सरकारने घ्यावी. अतिशय अमानुष पद्धतीने मारण्यात आले, या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आहे. सीआयडी चौकशी करत आहे. वेगवेगळ्या चौकशी सुरू आहेत. असेही देशमुख म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपावर देशमुख म्हणाले, राऊत हे मुंबईत असल्याने जास्त माहितीतून बोलले असतील. मुळात आतापर्यंत जो मुख्यमंत्री झाला ते वर्षावर गेले. देवेंद्र फडणवीस का गेले नाहीत मला माहित नाही. बीड प्रकरणात जो दोषी असेल तो समोर आला पाहिजे.
'हे' ईव्हीएम घोटाळ्याने आलेले सरकार
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी लोकसभेत बोलले. त्यांनी पाच महिन्यात 70 लाख मतदान वाढले यावर संशय व्यक्त केला. अधिकचे मतदान करण्यात आले. त्या माध्यमातून हे सरकार आले आहे. प्रकाश आंबेडकर सुद्धा कोर्टात गेले. यावर संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाने द्यावी, हे सरकार EVM घोटाळा करून आलेले सरकार आहे असा आरोप देशमुख यांनी केला. 2019 ते 2024 मध्ये किती मतदान वाढले, हे कसं काय शक्य झालं. मोदी लाट असताना 122 भाजप आमदार निवडून आले. आता 149 जागा लढवत 89 टक्के मतदान कसे झाले. शेतकरी, महागाई,बेरोजगारी गंभीर प्रश्न असताना यावर विश्वास बसणार नाही असेही देशमुख म्हणाले.