समृद्धी महामार्गावर ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक ; दोन जण गंभीर, पाच जण जखमीpudhari photo
Published on
:
04 Feb 2025, 6:20 pm
Updated on
:
04 Feb 2025, 6:20 pm
वर्धा : मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने रस्ता दुभाजकाचे बॅरिकेटींग तोडून ट्रॅव्हल्सला धडक दिली. या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी तर पाच जण किरकोळ जखमी झालेत. मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर विरुळ शिवारात चॅनेल क्रमांक ८४ परिसरात घडला. चालकाला झोपेची डुलकी आल्याने ट्रक अनियंत्रीत होऊन हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते.
घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना मिळताच पुलगाव येथील पीएसआय सदानंद वढतकर, मोहम्मद गौरव, पोलीस कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले. राष्ट्रीय महामार्ग मदत केंद्राचे पीएसआय प्रमोद धोटे, सुनील भगत, भारत पिसुड्डे, अजय बेले, निखिल वाडकर घटनास्थळी दाखल झाले आणि रस्ता वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहेत. अपघातामधील ट्रॅव्हल्स हायवे क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. रस्त्यावर लोखंडी अँगलसह ट्रक पलटी झाल्याने अँगल इतरत्र रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते. हायवे क्रेनच्या मदतीने अँगल रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. ट्रकच्या बाजूने बॅरिकेटस लावण्यात आले. वाहतूक संथगतीने सुरळीत करण्यात आली. ट्रॅव्हल्समधील प्रवाशांकरिता पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कळते.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरकडून सीजी ०७ सीपी ४५५९ क्रमांकाचा ट्रक लोखंडी अँगल भरून मुंबईकडे जात होता. एमपी ४४ झेडई ७८८४ क्रमांकाची ट्रॅव्हल्स सुमारे ३५ प्रवासी घेऊन पुण्याहून प्रयागराजला जात होती. समृद्धी महामार्गावर विरुळ शिवारात ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने अनियंत्रीत ट्रक मुंबई कॅरीडोरवरून लोखंडी बॅरिगेट तोडून नागपूर कॅरीडोरवर येऊन ट्रॅव्हल्सला धडकला. या अपघातात ट्रॅव्हल्स चालक रफिक खान इसार खान (वय २७) रा. जोधपूर राजस्थान आणि ट्रकमधील क्लिनर रणजितकुमार विश्वकर्मा रा. छतरपूर पलाऊ झारखंड हे दोघे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येते. या अपघातात पाच जणांना दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग जाम मदत केंद्राच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने पुलगाव येथे उपचारार्थ नेण्यात आले.