Published on
:
04 Feb 2025, 5:53 pm
Updated on
:
04 Feb 2025, 5:53 pm
यवतमाळ : शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या साधनकरवाडी येथे घाडसी घरफोडी करून चोरटयांनी सोने, चांदी व रोख रक्कम असा एकूण १४ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवार दि. ३ फेब्रुवारीला पहाटे उघडकीस आली. याबाबत प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
साधनकरवाडी येथे राहत असलेले प्रदिप चिंडालिया हे दि. २५ जानेवारीला कुटुंबासह रामेश्वर येथे गेले होते. त्यांच्या कुलूपबंद घराला चोरटयांनी टार्गेट केले. दरवाजाचा कुलूपकोडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटात ठेऊन असलेले १२ लाख ८० हजार ५०० रुपये किमतीचे १६ तोळे सोने, ६.५ किलो चांदी व रोख २ लाख रुपये असा एकूण १४ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. प्रदिप चिंडालिया यांच्या घरी साफसफाईचे काम करणारी महिला जेव्हा सोमवार दि. ३ फेब्रुवारीला साफसफाईसाठी आली तेव्हा तिला घराचा दरवाजा उघडा दिसला. घरी कुणी नसताना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने महिलेने ही माहिती शेजारच्यांना दिली. त्यानंतर प्रदिप चिंडालिया यांना याबाबत कळविण्यात आले. त्यांनी लगेच नागपूर येथे नोकरीवर असलेल्या आपल्या मुलाला वणी येथे पाठविले. मुलाने घरी येऊन पाहणी केली असता त्याला चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्याने लगेच ही माहिती पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी शीघ्र हालचाली करीत श्वान पथक व ठसे तज्ज्ञाला घटनास्थळी पाचारण केले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडेही तपासाची सूत्रे देण्यात आली आहे.
पोलिसांनी अक्षय प्रदिप चिंडालिया यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पथक चोरट्यांचा कसून शोध घेत आहे. दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी धाडसी घरफोडी करण्याइतपत चोरट्यांच्या हिमती वाढल्या आहेत. वणी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्यापुढे चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.