File Photo
Published on
:
04 Feb 2025, 6:04 pm
Updated on
:
04 Feb 2025, 6:04 pm
भंडारा : तुमसर शहरातील इंदिरा नगरातील राजकमल ड्राय क्लिनिंग आर्ट या दुकानात ५ कोटींची रोकड पोलिसांच्या धाडीत आढळली. त्यामुळे एकच खळबळ माजली. मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास ही कारवाई दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. गोपनीय माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली.
तुमसर शहरातील इंदिरा नगरात राजकमल ड्राय क्लीनिंग आर्ट या नावाने दुकान आहे. मंगळवारी दहशतवाद पथक भंडारा व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व पोलिसांना गोपनीय माहिती प्राप्त झाली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या दुकानात अचानक धाड टाकली. त्यामुळे मोठी गर्दी परिसरात झाली होती.
दुकानात पाच कोटी रोकड मिळाली
पोलिसांच्या तपासात ड्राय क्लीन च्या दुकानात पाच कोटी रोकड आढळली. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले. दुकानाचे संचालक जगदीश काटकर यांची पोलिसांनी दुकानात आढळलेल्या रकमेविषयी विचारपूस करून चौकशी केली.
दोन तास लागले रोकड मोजायला
राजकमल ड्रायक्लिनिंग या दुकानात पोलिसांनी तात्काळ पैसे मोजण्याची एक मशीन आणली. या मशीनला ५ कोटी रुपये मोजण्याकरिता सुमारे दोन तास लागले. मंगळवारी दुपारी एक ते चार पर्यंत दुकानातच संपूर्ण रोकड मोजण्यात आली.
ही कारवाई दहशतवाद पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोट, भंडारा येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे, प्रदीप शहारे, पंकज भित्रे, सचिन देशमुख रवींद्र गभने,सचिन सरोदे, राजेंद्र ठाकरे, देवेंद्र चामट,विजय आरणे तसेच तुमसर गुन्हे प्रकटीकरण पीएसआय सयाम, परिमल मूलकलवार ,बंडू काचगुंडे राजू गिरीपुंजे यांनी केली.