मोठी बातमी समोर येत आहे, आज पुन्हा एकदा माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळ यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
छगन भुजबळ यांनी आज सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी अर्धा तास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली, या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे. ‘ आज मी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो याच खरं कारण म्हणजे त्यांच्याकडे गृहमंत्रालय सुद्धा आहे, आणि आमच्या येवला पोलिसांना कवायत ग्राऊंडला भिंत टाकायची आहे, येवला पोलीस स्टेशनच्या पोलिसांसाठी घरं पाहिजे आहेत. आणि जादा पोलीस फोर्स पाहिजे. आमच्या इतर काही फायली देखील आहेत, उदाहरणार्थ आमच्या लासगाव कमिटीचं थोडं काम आहे. एस गाववरून आम्हाला येवल्याला पाणी आणायचं आहे त्याची फाईल आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी पडून आहे. त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. बाकी राजकारणावर चर्चा करण्याचं काही कारण नाही, राजकारणावर काय चर्चा करणार? असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दर मंगळवारी राष्ट्रवादीची आढावा बैठक होते, या बैठकीबाबत देखील भुजबळांना विचारण्यात आलं. यावर बोलताना जीथे माझी गरज नाही तीथे मी जात नाही, असं म्हणत त्यांनी बोलण टाळलं. तसेच तुम्ही अजूनही नाराज आहात का? असा सवालही त्यांना यावेळी करण्यात याला, त्यावर बोलताना ते म्हणाले मी नाराज आहे की नाही, किती नाराज आहे. हे कसं सांगता येईल. त्याचं थर्मा मीटर मला अजून तरी मिळालेलं नाहीये, अशी मिष्कील टिपणी देखील यावेळी भुजबळ यांनी केली. मात्र राजकीय वर्तुळात या भेटीची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.