Ladki Behen Yojana : राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. यंदाच्या निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी जर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले होते. त्यानुसार आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार आहेत. मात्र आता या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचे निकष वारंवार बदलले जात आहेत. त्यातच आता लाडक्या बहिणींचे टेन्शन आणखी वाढणार आहे. जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर तुमचे अर्ज बाद केले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेचा लाभ रद्द होणार
मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेची पडताळणी केली जाणार आहे. आजपासून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींची पडताळणी करणार आहेत. या पडताळणीत जर तुम्ही एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात राहत असाल आणि तुमच्या पती किंवा सासऱ्यांच्या नावावर चारचाकी असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमच्या नावावर चारचाकी असल्याचे निष्पन्न झाले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ रद्द केला जाणार आहे. येत्या दोन दिवसात ही पडताळणी केली जाणार आहे.
पुण्यात 21 लाख बहिणींचे अर्ज
लाडकी बहीण योजनेसाठी पुण्यात 21 लाख 11 हजार 991 बहिणींनी अर्ज केले होते. तसेच संपूर्ण राज्यातून अडीच कोटींहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या होत्या. मात्र या योजनेत निकषांमध्ये न बसलेल्या महिलांची संख्या अधिक होती. ही संख्या कमी करण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विभागाकडून पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. तसेच या योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांनाच मिळावा आणि २१०० रुपयांची अंमलबजावणी करताना त्याचा ताण सरकारी तिजोरीवर येऊ नये, म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.
अर्जाची छाननी बाकी
दरम्यान महिला बाल कल्याण विभागाकडे या योजनेसाठी अर्ज केलेल्यां पैकी राज्यातील अनेक अर्जाची अद्याप छाननी बाकी आहे. येत्या काही दिवसात ही छाननी पूर्ण करावी. त्यातून कोणते अर्ज नाकारायचे किंवा कोणते अर्ज मंजूर करायचे याचा निर्णय घ्यावा. त्यानंतरच अंतिम यादी ठरवावी, असे आदेश देण्यात आले आहेत.