सोलापूर : माघ वारीनिमित्त डिकसळ येथे रिंगण सोहळा झाला.
Published on
:
04 Feb 2025, 4:38 pm
Updated on
:
04 Feb 2025, 4:38 pm
मोहोळ : 'ज्ञानोबा माऊली तुकाराम..' च्या जयघोषात माघवारीनिमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी औसा संस्थानचा पायी दिंडी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही पार पडला. या दिंडी सोहळ्यात मराठवाडा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातून सुमारे अठरा हजार भाविक सहभागी झाले होते. मागील १६० वर्षांपूर्वीची परंपरा जोपासत लातूर जिल्ह्यातील औसा येथील वीरनाथ मल्लिनाथ महाराज संस्थानाच्या पायी दिंडी सोहळ्याचे मोहोळ तालुक्यातील मसलेचौधरी, डिकसळ,नरखेड या गावांमध्ये स्वागत करण्यात आले. त्यानंतर डिकसळ येथील भोगावती नदीपात्राच्या शेजारील शेतात प्रतिवर्षाप्रमाणे रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला.
मसलेचौधरी येथे मंगळवारी (दि.५) सकाळी पालखीच्या स्वागतानंतर पिठाधिपती ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर यांचे भजन झाले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता डिकसळ येथील भोगावती नदीपात्राच्या शेजारील शेतात प्रतिवर्षाप्रमाणे रिंगण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. यावेळी श्रीरंग महाराज यांचे चिरंजीव गीतेश्वर महाराज, गुरुबाबा ज्ञानराज महाराज, श्रीरंग महाराज, वीरनाथ महाराज निटूरकर, विणेकरी हरिभाऊ वाडकर यांची उपस्थिती होती. त्यानंतर या दिंडी सोहळ्याचे नरखेड येथे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.
तेथे श्री सिद्धेश्वर मंदिरात पिठाधीपती गुरुबाबा महाराज औसेकर, दास महाराज औसेकर, श्रीरंग महाराज औसेकर यांच्या हस्ते आरती व महापूजा करण्यात आली. मंदिरात भाविकांना अन्नदान वाटपाचा शुभारंभ गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आला. दिंडीतील पायी चालत येणाऱ्या भाविकांसाठी डॉ राज वसंतराव लवंगे यांनी मोफत आरोग्य तपासणी करून हजारो भाविकांना गोळ्या औषधेचे वाटप केले. श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर औसेकर महाराजांचा कीर्तन सोहळा पार पडला. पहाटे दिंडीमध्ये मलिकपेठ गावाकडे मार्गस्थ झाली. या भाविकांमध्ये दरवर्षीपेक्षाही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.