Published on
:
04 Feb 2025, 4:37 pm
Updated on
:
04 Feb 2025, 4:37 pm
पंढरपूर : दोन व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून रस्ता ओलांडत निघालेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये बिबट्या बेशुध्द होवून रस्त्याच्या बाजूला पडल्याने गावकऱ्यांनी बिबट्याला पकडुन पाय बांधून ठेवले. मात्र, वाहनाची धडक जोरात बसल्याने जखमी बिबट्या गतप्राण झाला. याची माहिती पोलिस आणि वनविभागाला देण्यात आली. ही घटना मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास माळशिरस तालुक्यातील दसूर पाटी टप्पा येथे घडली.
या बिबट्याने या भागात गेल्या महिनाभरापासून दहशत माजवली होती. अनेक शेळ्या, पाळीव कुत्रे यांच्यावर हल्ला करून फस्त करत होता. सध्या सतत बिबट्याचे दर्शन घडू लागले होते. यातच मंगळवारी माळशिरस पंढरपूर तालुक्याच्या सीमा भागात दसुर दरम्यान बिबट्या दिसून आला. या बिबट्याने दसुर येथील चंद्रकांत रामचंद्र रणवरे व समाधान खपाले या दोघांवर हल्ला केला. यात चंद्रकांत रणवरे यांच्या पोटाला व मांडीला जखमा झाल्या आहेत. तर समाधान खपाले देखील हल्ल्यात जखमी झाला आहे.
हल्ला करून पळून जात असताना पालखी महामार्ग ओलांडत असताना भरधाव वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत बिबट्या महामार्गाच्या बाजूला फेकला गेला. यात बिबट्या गंभीर जखमी झाला. या जखमी बिबट्याला ग्रामस्थांनी व महामार्गावरून ये जा करणाऱ्या लोकांनी पाय बांधून ठेवले. मात्र वाहनाची धडक इतकी जोरात होती की बिबट्या जागीच गतप्राण झाला. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.