सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. मुंबईतील स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याला सोलापुरातील एका शो दरम्यान मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. अभिनेता वीर पहारियावर खोचक विनोद केल्याने सोलापुरातील त्याच्या फॅन्सकडून मारहाण झाल्याचा दावा, प्रणित मोरे यानं केला आहे. वीर पहारियावर हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याचा नुकताच स्काय फोर्स हा चित्रपट रिलीज झाला असून, या चित्रपटानं 100 कोटींच्या क्लबमध्ये जागा मिळवली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
वीर पहारिया हा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू असून, नुकताच त्याचा ‘स्काय फोर्स’ हा सिनेमा रिलीज झाला आहे, या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोलापुरातील एका शो दरम्यान वीर पहारियावर खोचक विनोद केल्यानं स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याला मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
स्टॅन्डअप कॉमेडीयन प्रणित मोरे याने केलेल्या दाव्यानुसार 2 फेब्रुवारी रोजी सोलापुरातल्या एका हॉटेलमध्ये त्याचा स्टॅन्डअप शो झाला. या शो नंतर 11-12 लोकांचा एक गट फोटोसाठी विनंती करतं पुढे आला आणि त्यांनी प्रणितला मारहाण करून धमकी दिली. तन्वीर शेख नावाचा व्यक्ती हा या ग्रुपचा लीडर असल्याचंही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याबाबत आपन पोलिसांकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी देखील दखल घेतली नसल्याचा आरोप प्रणित मोरे याने केला आहे.
दरम्यान कॉमेडियन प्रणित मोरे याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपल्याबाबतीत घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर प्रणित मोरेच्या पोस्टवर अभिनेता वीर पहारियाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. या गोष्टीशी माझा संबंध नाही, ज्यांनी मारहाण केल्याचा दावा केला जात आहे, त्यांना मी ओळखत नाही. तरीही असा प्रकार घडला असेल तर मी माफी मागतो, तसेच जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल याबाबतची शाश्वती मी देतो. असं अभिनेता वीर पहारिया याने म्हटलं आहे.