शिवसेना ठाकरे गटातील युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सूरज चव्हाण यांना 1 लाखाच्या रोख जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सूरज चव्हाण यांना 17 जानेवारी 2024 रोजी अटक करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळातील या घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. सूरज चव्हाण यांना जामीन मिळाल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबासह मातोश्रीत दाखल झाले. यावेळी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांचे कौतुक केले.
युवासेनेच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना हायकोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर मोठी गर्दी केली होती. सूरज चव्हाण यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली होती. ज्यात तथ्य आढळल्यानं हायकोर्टानं सूरज चव्हाण यांना एक लाखाच्या रोख बाँडवर सुटका करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. यानंतर आज त्यांनी आर्थर रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली. सूरज चव्हाण यांची सुटका होणार असल्याचे कळताच तुरुंगाबाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
सूरज चव्हाण संपूर्ण कुटुंबासह मातोश्रीवर
सूरज चव्हाण यांच्या स्वागतासाठी अनिल परब आणि स्थानिक आमदार मनोज जामसुतकरही उपस्थित होते. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सूरज चव्हाण संपूर्ण कुटुंबासह उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर पोहोचले. यावेळी स्वत: सूरज चव्हाण, त्यांची आई, बाबा, त्यांची दोन मुलं, पत्नी असा परिवार उपस्थित होता.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“आज सूरज चव्हाण यांच्या मुलाचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे वडील घरी आले आहेत. आज मला या गोष्टींचा आनंद आहे. मला खरोखरच तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा अभिमान आहे. आज खूप आनंदाचा क्षण आहे. खरंच एक निष्ठावान शिवसैनिक कसा असायला हवा, त्याचं एक उत्तम उदाहरण सूरजने सर्वांसमोर ठेवलं आहे. सर्वच लोक विकाऊ किंवा गद्दार होऊ शकत नाही, हे एका कडवट, कट्टर आणि सच्चा शिवसैनिकाने दाखवून दिले आहे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.