Published on
:
04 Feb 2025, 2:23 pm
Updated on
:
04 Feb 2025, 2:23 pm
बिलोली : अल्पवयीन मुलीला जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी राजेश देविदास कागळे (वय ३७, रा. मंगनाळी ता. धर्माबाद) यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
याबाबत माहीती अशी की, बिलोली शहरात राहणारे फिर्यादी यांची इयत्ता १० वीत शिकणारी मुलगी राजेश देविदास कागळे यांच्याकडे शिकवणी वर्गासाठी जून २०१६ पासून जात होती. कागळे हे तिच्याकडे वाईट उद्देशाने बघत होते. शिकवणी वर्गामध्ये नेहमी टोमणे मारून मानसिक त्रास देत होते. पाठीवर हात फिरवणे, गाल पकडणे, तुमचे गणिताचे व विज्ञानाचे प्रॅक्टीकलचे मार्क माझे हातात आहेत म्हणून धमकावत होते. अशी तक्रार पिडीत मुलीने तिच्या वडिलांकडे केली होती.
१५/०२/२०१७ रोजी पिडीतेचे आई व बाबा बाहेरगावी गेले होते. पिडीता शिकवणी वर्गाला गेली असता यातील आरोपीने तिला काहीतरी वाईट हेतूने मनाला वेदना होतील असे शब्द बोलले. त्यामुळे पिडीतीने त्या शिक्षक आरोपीच्या त्रासाला कंटाळून चिठ्ठी लिहून स्वतःचे घरी येउन गळफास घेउन जीवन संपवले. अशी फिर्याद पिडीतेच्या वडीलांनी बिलोली पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यावरून बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोप पत्र जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल करण्यात आले.
न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करुन तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी मंगळवारी (दि.४) २५ हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदिप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात त्यांना तपासिक अमलदार एस. एस. दळवे व पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख महेबुब शेख अहेमद हुसेन यांनी सहकार्य केले.