Published on
:
04 Feb 2025, 4:48 pm
Updated on
:
04 Feb 2025, 4:48 pm
धुळे : साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे पुर्ववैमनस्यातून हाणामारी करून खून केल्याप्रकरणी धुळे सत्र न्यायाधिश जयश्री पुलाटे यांनी सर्व ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
घटनेचा सविस्तर वृत्तांत असा की, साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे आरोपी कन्हैय्या अशोक पवार याने साक्षीदार बापू हिरामण देसले यांच्याशी भांडण केले. त्याची पुन्हा कुरापत काढून त्या कारणावरून फिर्यादी काकाजी बाबुलाल माळी यांच्या घरासमोर रात्री भिमन हिरामण सोनवणे , कन्हैय्या अशोक पवार , युवराज रमेश सोनवणे , बापू रमेश सोनवणे , लक्ष्मण उर्फ लखा हिरामण सोनवणे, राज लक्ष्मण सोनवणे यांनी गैर कायदयाची मंडळी एकत्रित करून फिर्यादी व साक्षीदार यांना लाठ्या, काठया, लोखंडी टॅमीने मारहाण व शिवीगाळ केली त्यामध्ये हिरामण भावसिंग देसले हे गंभीर जखमी झाले. त्यांचा औषधोपचारा दरम्यान मृत्यु झाला होता. तसेच काकाजी चाबुलाल माळी, हिम्मत हिरामण देसले आणि सुनिताबाई माळी हे जखमी झाले होते. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तपासी अंमलदार तथा सहायक पोलीस निरीक्षक सुनिल भाबड यांनी करुन ६ आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोप निश्चिती नंतर खटल्याची सुनवणी धुळे येथील सत्र न्या. जयश्री पुलाटे यांच्या न्यायालयात सुरु झाली.
सुनावणीच्या वेळेस जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तंवर, यांनी फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार काकाजी बाबूलाल माळी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बापू हिरामण देसले, पंच चंद्रभान भगवान चव्हाण, दुखापती तसेच प्रत्यक्ष साक्षीदार हिंम्मत हिरामण देसले,शव विच्छेदन वैद्यकिय अधिकारी डॉ. रमेश काशिनाथ गढरी, वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिला खलील अहमद , पंच एकनाथ भट्ट ठाकरे, पो. कॉ. धनंजय दिपचंद मोरे, तपासी अधिकारी सुनिल भानुदास भाबड, असे एकूण ९ साक्षीदारांच्या महत्वपूर्ण जबाव साक्ष सरकार पक्षातर्फे न्यायालयात नोंदविण्यात आल्या.
तसेच आरोंपीनी या खटल्यात बचावाकामी तब्बल ६ साक्षीदारांची तपासणी केली होती. परंतु त्यांनी दिलेला पुरावा न्यायालयाने ग्राहय धरला नाही. सरकार पक्षातर्फे नमूद साक्षीदारांच्या साक्षीनुसार आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयात जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी प्रखर युक्तीवाद केला. तसेच सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालयाचे दाखले न्यायालयात युक्तीवादादरम्यान दाखल करण्यात आले.
हा युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपींचा गुन्हा सिध्द झाल्याने जिल्हा न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी विविध कलमाखाली दोषी ठरवून आरोपी अभिमन हिरामण सोनवणे, कन्हैय्या अशोक पवार, युवराज रमेश सोनवणे, बापू रमेश सोनवणे, लक्ष्मण उर्फ लखा हिरामण सोनवणे , राज लक्ष्मण सोनवणे, अशा सर्व ६ आरोपींना भा.द.वि ३०२ अन्वये जन्मठेप तसेच प्रत्येकी रक्कम रुपये १० हजार दंड, तसेच भा.द.वि ३२४ अन्वये २ वर्ष शिक्षा, व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची रक्कम भरण्याचा आदेश केला. तसेच कलम १४७ अन्वये ६ महिने, कलम १४८ अन्वये एक महिना शिक्षा ठोठावली, तसेच या घटनेतील दुखापती साक्षीदार बापु हिरामण देसले, हिम्मत हिरामण देसले यांना योग्य तो मोबदला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून देण्याचा आदेश केला.