Published on
:
04 Feb 2025, 4:50 pm
Updated on
:
04 Feb 2025, 4:50 pm
नवी दिल्ली : विरोधकांचे राजकीय नैराश्य समजू शकतो. पण, त्यातून देशाच्या राष्ट्रपतींचा, एका महिलेचा कशासाठी अवमान करता, असा खडा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदेत केला. त्यांनी यावेळी काँग्रेस नेते खा. राहुल गांधी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच काँग्रेसच्या तत्कालीन सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही कडाडून टीका केली.
गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटोसेशन करून स्वतःचे मनोरंजन करणार्यांना संसदेत गरिबांबद्दल बोलणे कंटाळवाणेच वाटेल, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींचा थेट नामोल्लेख न करता केला. राहुल गांधींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे भाषण कंटाळवाणे असल्याचे म्हटले होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मंगळवारी मोदी यांनी संविधान, मागासवर्गीय आणि दलितांच्या विषयांवरूनही विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान परराष्ट्र धोरणावर चर्चा झाली. मात्र काही लोकांना असे वाटते की, ‘फॉरेन पॉलिसी’ असा उल्लेख केला नाही तर परराष्ट्र धोरणावर चर्चाच झाली नाही. अशा लोकांनी ‘जेएफकेज फॉरगॉटन क्रायसिस’ हे एक पुस्तक वाचावे. यामध्ये पंडित नेहरू आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्यातील चर्चा आणि निर्णयांचे तपशीलवार वर्णन केले आहे. जेव्हा देश अनेक आव्हानांना तोंड देत होता, तेव्हा परराष्ट्र धोरणाच्या नावाखाली कोणता खेळ खेळला जात होता ते त्या पुस्तकातून बाहेर येते, असेही ते म्हणाले.
संसदेत एकाच वेळी एकाच कुटुंबातील तीन दलित किंवा आदिवासी खासदार कधी होते का, हे कोणी सांगू शकेल का? काही लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात किती फरक आहे, हे माझ्या या प्रश्नाच्या उत्तरात दिसून येईल. काही लोक भारतीय राज्यांच्या विरोधात भूमिका घेतात. अशा लोकांना संविधान समजू शकत नाही, असे सांगत त्यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले. दिल्लीत तुम्हाला अशी अनेक ठिकाणे सापडतील, जिथे काही कुटुंबांनी स्वतःची संग्रहालये तयार केली आहेत. हे काम जनतेच्या पैशातून केले जात आहे. लोकशाहीचा आत्मा काय आहे, संविधानाचे पालन करणे कशाला म्हणतात, असे बिनतोड प्रश्न मोदी यांनी उपस्थित केले.
पंतप्रधान म्हणाले की, आमच्या स्वच्छता मोहिमेची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली. मात्र या स्वच्छता मोहिमेमुळे सरकारी कार्यालयांमधील कचरा विकून सरकारी तिजोरीत 2300 कोटी रुपये जमा झाले. 2014 पूर्वी ज्यांनी युरिया मागितला त्यांच्यावर लाठीमार व्हायचा आणि आज ते शेतकर्यांबद्दल बोलतात. आमचे सरकार शेतकर्यांसाठी काम करत आहे आणि आम्ही कृषी अर्थसंकल्पात 10 पट वाढ केली आहे. गेल्या 10 वर्षांत खतांवर 12 लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत.
एआय म्हणजे अॅस्पिरेशनल इंडिया
पंतप्रधान म्हणाले की, काही लोक एआयबद्दल बोलतात. आम्ही डबल एआयवर काम करत आहोत. एक एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसरे एआय म्हणजे अॅस्पिरेशनल इंडिया. भारत हा असा देश आहे, ज्याच्या एआय मिशनबद्दल संपूर्ण जग खूप आशावादी आहे. जगातील एआय प्लॅटफॉर्ममध्ये भारताच्या उपस्थितीने खूप महत्त्वाचे स्थान मिळवले आहे.
पंतप्रधानांनी अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता त्यांच्या शीशमहालवर टीका केली. लोक स्टायलिश शॉवरवर लक्ष केंद्रित करतात. याच्या उलट आमचे लक्ष प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करते. आमच्या सरकारने देशातील 70 टक्केपेक्षा जास्त घरांना नळाचे पाणी पुरवण्याचे काम केले. आम्ही 5 वर्षांत 12 कोटी कुटुंबांना नळाच्या पाण्याचा लाभ दिला, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, काही लोकांसाठी जातीबद्दल बोलणे फॅशनेबल झाले आहे. गेल्या 30 वर्षांपासून सभागृहात येत असलेले ओबीसी समुदायाचे खासदार एकजुटीने ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याची मागणी करत होते. आज जे जातिवादात आहेत त्यांना त्यावेळी ओबीसींची आठवण नव्हती. आम्ही ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला. आम्ही प्रत्येक क्षेत्रात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीयांसाठी संधींसाठी काम केले. आम्ही एससी-एसटी समुदायाला सक्षम बनवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात महाकुंभ चेंगराचेंगरीचा उल्लेखही केला नाही. मोदी स्वतः बुधवारी महाकुंभस्नानासाठी जाणार आहेत.
महाराष्ट्रातील विजय ऐतिहासिक
हरियाणामध्ये सलग तिसर्यांदा सरकार स्थापन केल्याबद्दल आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी भाजपची पाठ थोपटली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात ऐतिहासिक निकाल मिळाले आहेत. जनतेच्या आशीर्वादाने सत्ताधारी पक्षाला पहिल्यांदाच इतक्या जागा मिळाल्या.