वरुण चक्रवर्ती
Published on
:
04 Feb 2025, 12:27 pm
Updated on
:
04 Feb 2025, 12:27 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळख असलेल्या वरुण चक्रवर्तीचा भारतीय संघात अचानक समावेश करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. वरुणने नागपूरमध्ये टीम इंडियासोबत सराव केल्यामुळे त्याचा भारतीय संघात समावेश केल्याचे मानले जात आहे. मात्र, त्याचा कोणत्या खेळाडूच्या जागी समावेश करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (IND vs ENG ODI Series Varun Chakravarthy)
टीम इंडियाने नुकताच इंग्लंडचा टी-20 मालिकेत 4-1 ने दारुण पराभव केला. या मालिकेत वरुण चक्रवर्तीने चमकदार कामगिरी केली. त्याने 5 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या. त्याच्या तो प्लेअर ऑफ द सीरिज ठरला. इंग्लंडच्या बहुतेक फलंदाजांनी वरुणविरुद्ध खेळताना शरणागती पत्करली.
वरुणने अद्याप एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. मुंबईत टी-20 मालिका संपल्यानंतर भारताचा एकदिवसीय संघ नागपूरला पोहोचला. वरुण एकदिवसीय संघाचा भाग नव्हता, तरीही त्याने नागपूरमध्ये संघासोबत सराव केला. त्यामुळे त्याचा भारतीय संघात समावेश केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरुणने स्थानिक लिस्ट-ए कारकिर्दीत 23 वनडे सामने खेळले. त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या गेल्या हंगामात तमिळनाडूकडून 6 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या. तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. वरुणच्या उपस्थितीमुळे भारताचा फिरकी विभाग अधिक मजबूत होईल असे तज्ज्ञांचे मत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला गुरुवारी, 6 फेब्रुवारी रोजी सुरुवात होत आहे. भारतीय संघात कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटूंचा समावेश आहे.
बीसीसीआयने अद्याप वरुणला एकदिवसीय संघात समाविष्ट करण्याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. मात्र, असे मानले जाते की वरुणला त्याच्या उत्कृष्ट फॉर्मचा नक्कीच फायदा होईल. निवड समिती याबाबत विचार करेल. गेल्या वर्षी ऑगस्टनंतर भारताने एकही एकदिवसीय सामना खेळला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, संघ इंग्लंडविरुद्ध फक्त एकच एकदिवसीय मालिका खेळेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी संघातील 3 विशेषज्ञ गोलंदाज दुखापतींमधून सावरत आहेत. मोहम्मद शमी 14 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. जसप्रीत बुमराह जखमी आहे. त्याच वेळी, कुलदीप यादव देखील दुखापतीतून सावरल्यानंतर त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 6 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये खेळला जाईल. त्यानंतर दोन्ही संघ 9 फेब्रुवारी रोजी कटकमध्ये आणि 12 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये आमनेसामने येतील. या मालिकेनंतर, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी दुबईला जाणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाची पहिली लढत 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध आहे.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये वरुण चक्रवर्तीचा समावेश नव्हता. तथापि, 11 फेब्रुवारीपर्यंत स्पर्धेसाठी संघात बदल करता येणार आहे.