पुणे शहर परिसरात घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 2 पिस्तूल, काडतुसे, सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 12 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. समीर उर्फ कमांडो हनीफ शेख, यश मुकेश शेलार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कमांडो हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून शेलार याने त्याला पिस्तुले पुरविल्याचे समोर आले आहे.
पुणे शहर परिसरात घरफोडी, वाहनचोरीचे गुन्हे वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांवर कारवाया करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर असताना फुरसुंगी भागात एकजण संशयितरित्या थांबला असल्याची माहिती पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून समीर शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, घरफोडीचे साहित्य जप्त करण्यात आले. तपासात त्याने कोंढवा, लोणी काळभोर, हडपसर भागात चोरी केल्याची कबुली दिली. शेख याला पिस्तुले पुरविणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार यश शेलार यालाही पोलिसांनी अटक केली. दोघांकडून पोलिसांनी दोन पिस्तुल, काडतुसे, सोन्या चांदीचे दागिने, वाहने असा 12 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.