अमरावती (Super specialty hospital) : तीन दिवसीय नवजात शिशूच्या पोटातील दोन मृत अर्भक शस्त्रक्रियेद्वारे काढून त्या शिशुला जीवनदान देण्यात अमरावती येथील स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयांच्या वैद्यकीय पथकास यश आले आहे. नवजात शिशुस बुलढाणा येथून दोन दिवसापूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
बुलढाणा येथील महिलेच्या गर्भामधील गर्भाच्या पोटात गर्भ असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. (Super specialty hospital) बुलढाणा येथील डॉक्टरांनी महिलेची सोनोग्राफी केली असता त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार लक्षात आला होता. तदनंतर महिलेचे सिजेरिंयन करण्यात आले. यानंतर नवजात शिशुला छत्रपती संभाजी नगर येथे पाठविण्याचे हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु डॉक्टरांनी नवजात शीशुला अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेतला.
त्या शिशुस विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे पाठविण्यात आले होते. सुरुवातीला बाळाला रुग्णालयातील एन.आय. सी .यु. मध्ये ठेवण्यात आले. रुग्णालयात भरती केल्यानंतर त्याची सोनोग्राफी व सिटीस्कॅन तपासण्या करण्यात आले होते. नवजात शिशूच्या पोटामध्ये दोन मृत अर्भक असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी सर्व प्राथमिक तपासण्या केल्या होत्या.
त्यानंतर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची टीम यांनी तीन दिवसीय मुलाची शस्त्रक्रिया करून त्या बाळाच्या पोटातील दोन मृत अर्भक काढून त्या बाळाचे प्राण वाचवले. सद्यस्थिती त्या मुलाची प्रकृती चांगली असून त्याला एन. आय. सी. यू. मध्ये ठेवण्यात आलेले आहे.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या (Super specialty hospital) येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ.मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पेडियाट्रीक सर्जन डॉ. नवीन चौधरी, डॉ. उषा गजभिये, बधिरीकरन तज्ञ डॉ. संजय महतपुरे, बालरोग तज्ञ डॉ.नितीन बरडिया ,डॉ. ऋषिकेश नागलकर, डॉ. निलेश पाचबुद्धे, आर .एम .ओ. डॉ.माधव ढोपरे, माला सुरपाम यांच्या मार्गदर्शनाखाली इन्चार्ज सिस्टर विद्या चुडे, पुष्पा घागरे, ज्योती गोंडसे, मनीषा राऊत, इलायजा तेलगोटे, रूपाली गवई, स्नेहा काळे, समाजसेवा अधीक्षक शितल बोंडे, डॉ. श्याम गावंडे, डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यानी मुंदाने, औषध विभाग योगेश वाडेकर,सुधीर मोहोळ, आशिष आत्राम, सारिका कराळे, ज्ञानेश्वर डोंगरे ,अर्चना डंबाले शस्त्रक्रिया उपचारासाठी परिश्रम घेतले.
दरम्यान, सदर शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आली असल्याचे (Super specialty hospital) रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.