आचरा : एऽऽ इनामदार, वतनदार, कौलकरी माझा नव्या काय सांगूचा नाया ..! ...... ज्याप्रमाणे तुझे वाडवडील या पाषाणावर....... या मांडणेवर, या गावात आणि या बारात जसे वागले, तसे असलेले चार तुम्ही वागा, वागल्यावर अन्न, वस्त्र, निवारा मिळून कुटुंबाचा संरक्षण होईल आणि चाकरी माझ्या पाषाणाकडे राजी होईल, असे मालवणी बोलीभाषेतून ग्रामदेवतेचे, रामेश्वराच्या मांडणीचे तरंग आपल्याशी संवाद साधतात दिसतात आणि क्षणार्धात आपले तन - मन- धन रोमांचित होऊन जाते. तो परिणाम होतो रामेश्वराच्या आशीर्वादाचा ..!!
त्या एका अलौकिक आशीर्वादाने प्रत्येक आचरेवासीयाला वर्तामानाची जाण येते..! भविष्याची दिशा समजते..! त्या आपुलकीच्या दोन शब्दात आपल्या पूर्वजांबद्दल आदर, वाडवडिलांच्या सद्भावनाबद्दल जिव्हाळा त्यांच्या प्रयत्नाबद्दल प्रेम, त्यांच्या ईश्वर निष्ठेबद्दलची आपुलकी, आपल्या तनामनात भिनत असते आणि सर्वांग श्री रामेश्वर होतो. हजारो भाविकांचा सोबतीने श्री रामेश्वर आचरेवासीयांच्या अडीअडचणी, गार्हाणी ऐकून घेत सर्व आपल्या रयतेला आशीर्वचन देत हळूहळू आचरे गावची परिक्रमा करीत आहे. पहिल्या दिवशीच्या श्री देवी गिरावळ मंदिरातील मुक्कामानंतर मंगळवारी दुपारी भंडारवाडी, बौद्धवाडी महास्थळ येथून काझीवाडा शेख मौहल्ला मार्गावर, गाऊडवाडी येथे स्वारीचे बंदुकाच्या फैरीने व तोफेच्या सलामीने मृंदूगाची थाप, सनई तुतारीच्या मंजूळ स्वरांनी, ढोल, ताशाने, श्री चे जंगी स्वागत करण्यात आले.
रयतेची सुख दु: खे जाणून घेण्यासाठी लोककल्याणकारी राजा श्री देव रामेश्वर अंगणात आल्याने आचरावासीय आनंदून जात आहेत. बारावाड्यातील रयतेचे सुख दु:ख जाणून घेत देवस्थानच्या भेटीगाठी घेण्यासाठी श्री देव रामेश्वर आपल्या तरंग स्वरीसह,महालदार , भालदार, चोपदार, हुद्देदार,अबदागीर, निशाणे, ताशा , छत्रचामरे, भगवे बावटे, वाजंत्रींसह संस्थानी आब राखत भक्तांच्या ओट्या स्वीकारत गावच्या परिक्रमेस निघाले आहेत. दर तीन वर्षानी होणार्या या डाळपस्वारीचा थाट काही वेगळाच असतो. श्री देव रामेश्वर आपल्या 5 तरंगासह आचरा गावातील जनतेच्या भेटी गाठी घेऊन त्यांना आशीर्वाद देत गावची परिक्रमा पूर्ण करतो. 7 दिवस चालणार्या या डाळपस्वारीला रविवार वसंतपंचमी पासून शाही थाटात सुरूवात झाली.
मंगळवारी दुपारी गिरावळी मंदिरातील रासपोटाळणी विधीचा शाही थाट पहाण्यासाठी मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर, बेळगाव तसेच आचरा दशक्रोशीतील भाहवकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ठिक ठिकाणी ‘श्री ’ चे होणारे जंगी स्वागत, भाविकांची आपल्या देवाप्रती असलेली श्रध्दा लीनतेने आदरपूर्वक दाखवत होते. घरोघरी गुढ्या, तोरणे, रंगीबेरंगी पताका, शेणाने सारवण करून रांगोळ्या घालण्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्री गाऊडवाडीतील ग्रामस्थांकडून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेंच 5 फेब्रुवारी रोजी सकाळी गाऊडवाडी येथील श्री ब्राम्हणदेव मंदिर येथून जामडूल बेटावर ‘श्री’ ची स्वारी जाणार आहे.तिथे जेरोन फर्नांडीस व मोतेस फर्नांडीस यांनी भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था केली आहे.
नंतर तेथून सायंकाळी ‘श्री’ ची स्वारी होडीतून जलविहार करत पिरावाडीत प्रवेश करणार आहे. तेथून रात्री उशिरा हिर्लेवाडी मार्गे ब्राह्मणमंदिर ते गिरावळी मंदिर असा ‘श्री ’ स्वारी पहाटेचा प्रवास राहणार आहे. गुरूवार 6 रोजी सकाळी गिरावळी मंदिरात मुक्काम. शुक्रवारी 7 रोजी गिरावळी मंदिर येथून आचरा बाजारपेठेमार्गे ब्राह्मणमंदिर नागोचीवाडी, सायंकाळी पारवाडी मार्गे ‘श्री ’ स्वारीचे रामेश्वर मंदिरात आगमन होणार आहे.