पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गरिबीच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबांबाबतची चर्चा कंटाळवाणीच वाटणार, काही नेते गरिबांच्या झोपडीत जाऊन फोटो सेशन करतात, पाच दशक देश गरिबी हटावचा नाराच ऐकत होता’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मोदी?
काही नेते गरिबांच्या झोपडीत जाऊन फोटो सेशन करतात, फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबांबाबतची चर्चा कंटाळवाणीच वाटणार. देशानं पाच दशक गरिबी हटावचे नारे ऐकले. दिल्लीतून एक रुपया निघायचा तर 15 पैसे गरिबांना मिळायचे. मात्र आम्ही खोट्या घोषणा न देता खरा विकास केला. बचत आणि त्यातून विकास हे आमच्या सरकारचं मॉडेल आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये 25 कोटी जनता गरिबिमधून बाहेर आली, असा दावा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही खोट्या घोषणा न देता खरा विकास केला आहे. तीन लाख कोटी रुपये चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवले, दहा कोटी बनावट लाभार्थ्यांची नावं आम्ही हटवली. बचत आणि विकास हेच आमच्या सरकारचं मॉडेल आहे. पूर्वी दिल्लीतून एक रुपया निघाला की गरिबांच्या हातात केवळ 15 पैसे पडायचे, पण आता गरिबांच्या खात्यात थेट पैसा जमा होत आहे. प्रत्येक घरात नळानं पाणी पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना मोदींनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं. जास्त ताप आल्यावर लोक काहीही बोलतात, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर केला आहे. यावेळी बोलताना मोदी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली, आता या टीकेला काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.