भोकरदन पोलिसांनी विवाहितेची आलापूर येथून सुटका करीत तिच्या पतीच्या स्वाधीन केले.Pudhari Photo
Published on
:
04 Feb 2025, 12:42 pm
Updated on
:
04 Feb 2025, 12:42 pm
भोकरदन: मुलीने आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर मुलगी माहेरी आल्यावर आई-वडिलांनी तिला साखळदंडाने बांधन ठेवल्याने पतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पत्नीला सोडविण्यासाठी धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशनानंतर भोकरदन पोलिसांनी विवाहितेची आलापूर या गावातून सुटका करीत तिच्या पतीच्या स्वाधीन केले.
भोकरदन शहरालगत असलेल्या आलापूर येथील खालिद शहा सिकंदर शहा यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल हिचे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर येथील मिसारवाडी येथे राहत असताना तेथील सागर संजय ढगे या मुलासोबत तिने आंतरधर्मीय विवाह केला होता. विवाहानंतर शहा कुटुंबीय आलापूर येथे मूळ गावी राहण्यासाठी गेले होते. विवाहानंतर शहनाज हिला मुलगा झाला. तो आता तीन वर्षाचा आहे. दोन महिन्यांपूर्वी शहनाज हिच्या मोठ्या बहिणीची प्रसूती झाल्याने तिचे बाळ बघण्यासाठी शहनाज हिला तिच्या आईने आलापूर येथे बोलावले.
शहनाज तिचा पती सागर व मुलगा कर्तीक यास घेऊन आलापूर येथे गेली असता तिच्या कुटुंबीयांनी शहनाज व कार्तिक यास घरात डांबून ठेवत पती सागर याला घरातून हाकलून दिले. यानंतर 7 डिसेंबर रोजी सागर पुन्हा त्याच्या पत्नीला घेण्यासाठी गेला असता तुझा व आमचा धर्म वेगळा असून आम्ही शहनाज हिचे आमच्या धर्मात पुन्हा दुसरे लग्न लावून देणार आहोत, असे सांगत शहनाज यांच्या घरच्या लोकांनी सागर याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन हाकलून दिले.
यानंतर 24 डिसेंबररोजी शहनाज च्या बहिणीने सागर यास फोन करून सांगितले की, शहनाज व तिच्या मुलाला तिच्या आई-वडिलांनी जबरदस्तीने घरात डांबून ठेवले असून त्यांच्या जीविताला धोका आहे. त्यानंतर सागर याने छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेत न्यायालयाकडे पत्नीची व मुलाची सुटका करण्याची विनंती केली. त्यामुळे उच्च न्यायालयाने भोकरदन पोलिसांना सुटका करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी उपनिरीक्षक बी.टी. सहाने व महिला कर्मचारी सीमा देठे यांना आलापूर येथील खालेद शहा यांच्या घरी पाठवले. मात्र, त्यांना शहनाज हिच्या आईने कोणताही थारा लागू दिला नाही. अखेर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर तिची सुटका करण्यात आली. आईने किल्ली न दिल्यामुळे पर्यायी किल्लीचा वापर करीत साखळदंड तोडण्यात पोलिसांना यश आले. यानंतर तिला पतीकडे स्वाधीन करण्यात आले. या कारवाईची माहिती खंडपीठाला देण्यात आली.