भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी १ फेब्रुवारीला संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर अद्याप कोणत्याही राज्याच्या अर्थसंकल्प जाहीर झालेला नाही. पण देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे या महापालिकेचे बजेट हे ८ राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की ही महापालिका नेमकी कोणती? कोणत्या राज्याची? याचे आर्थिक बजेट नेमकं किती? तर याचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
देशातील सर्वात मोठी महानगरपालिका ही दुसरी तिसरी कोणतीही नसून मुंबई महानगरपालिका आहे. ज्याचे पूर्ण नाव बृहन्मुंबई महानगरपालिका असे असून आज मुंबई महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 74 हजार 427 कोटी रुपयांचा आहे. मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्यावर्षी मुंबई महापालिकेचा बजेट ६५ हजार १८० कोटी इतका होता. म्हणजेच यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील अनेक राज्यांचे बजेट मुंबई महापालिकेइतकेही नव्हते.
‘या’ 8 राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचे बजेट जास्त
देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. यानंतर आता विविध राज्यांचे बजेट येण्यास सुरुवात होईल. याचा अर्थ असा की २०२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प कोणत्याही राज्यासाठी आलेला नाही. २०२५ या आर्थिक वर्षासाठी बीएमसीचे बजेट ६५,१८०.७९ कोटी रुपये होते. जर आपण राज्यांबद्दल बोललो तर, २०२५ च्या आर्थिक वर्षात हिमाचल प्रदेशचे बजेट ५८,४४३.६१ कोटी रुपये होते. तर मेघालयाचे ५२,९७४ कोटी रुपये, अरुणाचल प्रदेशात ३४,२७० कोटी रुपये, त्रिपुरात २२,९८३ कोटी रुपये, मणिपूरमध्ये २९,२४६ कोटी रुपये, मिझोरममध्ये १३,७८६ कोटी रुपये, नागालँडमध्ये १९,४८५ कोटी रुपये आणि सिक्कीममध्ये १३,५८९ कोटी रुपये होते.
राज्य | आर्थिक वर्ष 2024-25 चे बजेट (कोटी रुपयांमध्ये) |
गोवा | 24,751 |
अरुणाचल प्रदेश | 34,270 |
मणिपूर | 29,246 |
मेघालय | 52,974 |
मिझोराम | 13,786 |
नगालँड | 19,485 |
सिक्कीम | 13,589 |
त्रिपुरा | 22,983 |
बेस्ट बससाठी १००० कोटी रुपयांची
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका संस्था मानल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी बेस्ट बस सेवेसाठी १००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बेस्ट बस ही लोकल सेवेनंतर मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. यात सुमारे ३,००० बसेस आहेत. या बसमधून दररोज ३० लाखांहून अधिक प्रवाशी प्रवास करतात. मुंबई महानगर पालिकेकडून 2012-13 पासून जानेवारी 2025 पर्यत बेस्ट उपक्रमास 11304.59 कोटी इतक्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे. 2025-26 मध्ये 1000 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
कोणत्या खात्यासाठी किती कोटींची तरतूद?
तसेच रस्ते व वाहतूक खात्याकरिता 2025- 26 या अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये 5100 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्प करिता 2025- 26 चा अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये 4300 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आरोग्य खात्याचे बजेट 7379 कोटी आहे. मुंबई महापालिका शिक्षण खात्याचं यंदाच्या वर्षीच बजेट 3955 कोटी रुपये असेल.