महापालिकेचे कर्करोग रुग्णालय File Photo
Published on
:
04 Feb 2025, 10:36 am
Updated on
:
04 Feb 2025, 10:36 am
दीपेश सुराणा
पिंपरी : कर्करोगाविरुद्धच्या लढाईसाठी शहरात महापालिकेचे नवीन रुग्णालय उभे राहणे गरजेचे आहे. मात्र, थेरगाव येथे प्रस्तावित असलेल्या या रुग्णालयाचे कामकाज सध्या निविदाप्रक्रियेतच अडकले आहे. रुग्णालयाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी अद्याप मुहूर्तच सापडलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र खासगी रुग्णालयात कर्करोगावर महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात कर्करोगासाठी सुरू केलेल्या डे केअर सेंटरमध्ये 5 खाटांचीच सोय आहे. ही सुविधा देखील तोटकी ठरत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, या रुग्णांसाठी उपचाराची सोय महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे थेरगाव येथे 60 खाटांचे रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. हे रुग्णालय नागरिकांच्या खासगी भागीदारी तत्त्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) उभारण्यात येणार आहे. शहरातील गोरगरीब कर्करोग झालेल्या रुग्णांना अल्पदरात उपचार मिळावे, यासाठी हे रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे.
कर्करोग रुग्णालयाची गरज का जाणवतेय ?
शहरामध्ये गेल्या काही वर्षात कर्करोग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
खासगी रुग्णालयांमधील उपचाराचा खर्च सर्वसामान्य रुग्णांना अवाक्याबाहेर.
महापालिकेच्या एकाही रुग्णालयात सध्या कर्करोगावर उपचाराची सुविधा नाही.
जिल्हा रुग्णालयातील सुविधा तुटपुंजी
थेरगाव येथील महापालिकेच्या रुग्णालयाजवळ 35 गुंठे जागा आहे. या जागेत कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी रुग्णालय उभारले जाणार आहे. त्यासाठी सध्या निविदा कार्यवाही सुरू आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे एक पथक सुरत शहरातील पीपीपी तत्त्वावर असलेल्या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला. तसेच, थेरगाव येथे रुग्णालय उभारण्याचे निश्चित करण्यात आले. रुग्णालय सुरू झाल्यानंतर महापालिका ठरवेल त्या दरानुसार कर आकारणी करणे बंधनकारक केले जाणार आहे. त्यामुळे हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन वर्षात रुग्णालय उभारले जाणार आहे.
सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयामध्ये कर्करोग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी सप्टेंबर 2024 पासून डे केअर सेंटर सुरू करण्यात आले. या डेअर केअर सेंटरमध्ये 5 खाटांचीच सोय आहे. पुणे जिल्ह्यातून येणारी रुग्णसंख्या लक्षात घेता ही सोय तुटपुंजी ठरत आहे. येथे उपचारासाठी येणार्या रुग्णांची सरकारी किंवा खासगी रुग्णालयांमध्ये चाचणी घेऊन निदान केले जाते. पुढील तपासणी व उपचारासाठी ते जिल्हा रुग्णालयाच्या डे केअर सेंटरमध्ये येतात.