Published on
:
04 Feb 2025, 6:40 am
Updated on
:
04 Feb 2025, 6:40 am
राहुरी : शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभाग कर्मचार्यांनी थेट पिंजर्यात सुखरूप अडकविल्याने उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास टाकला! तालुक्यातील म्हैसगाव परिसरातील शेतकरी प्रमोद दुधाट यांच्या विहिरीत बिबट्या पडला होता. रविवारी रात्री भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
दुधाट यांचे वाटेकरी सकाळी वीज मोटार सुरु करण्यासाठी गेले असता, त्यांना गुर्र- गुर्रणारा बिबट्या विहिरीत पडलेला दिसला. या घटनेची माहिती त्यांनी दुधाट यांना दिली. यानंतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रस्सीला बाज बांधून ती विहिरीत सोडली. दुसर्या बाजुकडून पिंजरा रस्सीच्या सहाय्याने बाजेच्या समांतर सोडून बिबट्याला पिंजर्यात अलगद अडकविले. पिंजर्यात जेरबंद केलेल्या बिबट्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात आले. बिबट्या पाच- सहा महिन्यांचा आहे, असे वन अधिकार्यांनी सांगितले. पिंजर्यासह बिबट्याला बारागाव नांदूर येथील नर्सरीमध्ये सोडण्यात आले.
मादी बिबट्यासह बछड्यांचा संचार!
म्हैसगाव ग्रामस्थांच्या माहितीनुसार, या भागात मादी बिबट्यासोबत बछडे निदर्शनास येतात. या परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. यापूर्वी येथे अनेक बिबटे शेतकर्यांना दिसले आहेत.
म्हैसगाव, कोळेवाडीत पिंजरे लावा!
राहुरी तालुक्यातील म्हैसगावसह कोळेवाडी, मायराणी, आग्रेवाडी, गाडकवाडी व ताहाराबाद परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात संचार सुरु आहे. बहुतांश शेतकर्यांना बिबट्यांचे दर्शन झाले आहे. यामुळे या गावांमध्ये वनविभागाने तत्काळ पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकर्यांनी केली आहे.