मेहकरमधील धान्य खरेदी व्यापाऱ्याची सोयाबीन विक्रीत फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात मेहकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्याची तब्बल 36 लाख 87 हजार 541 रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
येथील धान्य खरेदी व्यापारी दिनेश शंकरलाल अग्रवाल यांचे श्रीनिवास ट्रेडिंग नावाने अडत दुकान आहे. त्यांनी पाच जणांना 752.70 क्विंटल सोयाबीन विकले होते. याची किंमत 36 लाख 87 हजार 541 रूपये होती. सदर रक्कम पाच दिवसात देण्याचे ठरले होते. मात्र रक्कम न मिळाल्याने दिनेश अग्रवाल यांनी संबधितास संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणी अग्रवाल यांच्या तक्रारीवरून आरोपी दिनेश रामपाल शेरावत(दिल्ली), केशव दीपक मित्तल(दिल्ली), अजित दुबे, सुरेंद्र, दीपक मित्तल (दिल्ली) या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सम्राट ब्राह्मणे करीत आहेत.