कुटुंबात कार, तर लाडकी बहीण योजनेतून नाव बादFile Photo
Published on
:
04 Feb 2025, 6:39 am
Updated on
:
04 Feb 2025, 6:39 am
पुणे: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन चारचाकी वाहनांची पाहणी केली जाणार आहे. लाभार्थी महिलेच्या कुटुंबात कोणाकडेही चारचाकी आढळून आली तर तत्काळ लाडकी बहीण योजनेतून नाव काढून टाकले जाणार आहे.
अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. राज्याच्या महिला व बालविकास कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालविकास कल्याण अधिकार्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या.
चारचाकीधारकांची नावे जाणार ‘महिला बालविकास विभागा’कडे शासनाच्या वतीने चारचाकी असणार्या कुटुंबीयांची यादी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास कल्याण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. यानंतर अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन चारचाकी वाहन आहे का? याची पाहणी करण्यात येणार आहे.
ज्या महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतला असेल आणि त्यांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे, अशा लाभार्थ्यांची नावे महिला व बाल विकास विभागाला पाठविण्यात येणार आहेत. यानंतर लाभार्थी महिलांची नावे तत्काळ या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
नवे निकष कोणते?
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी लाभार्थी महिलेचे वय 18 ते 65 असावे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावे.
कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा.
संजय गांधी योजनेसारख्या दुसर्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
चारचाकी वाहने असणार्या महिला योजनेच्या लाभार्थी नसाव्यात, असे निकष ठरविण्यात आले आहेत.
विभक्त लाडक्या बहिणींना राहणार लाभ
कुटुंबातील सासरे, दीर अथवा इतरांच्या नावावर चारचाकी असेल आणि लाभार्थी महिला पती, मुलांसोबत विभक्त राहत असेल, तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे.
...तर करणार कडक कारवाई
निकषांमध्ये न बसणार्या लाडक्या बहिणींना स्वतःहून लाभातून माघार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, यानंतरही लाभार्थी महिलांच्या वतीने माघार घेण्यात येत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यास, अशा लाडक्या बहिणींवर प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
जिल्ह्यातून केवळ पाच महिलांची योजनेतून माघार
लाडकी बहीण योजनेतील निकषांची पडताळणी होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील पाच लाडक्या बहिणींनी लाभ नाकारला आहे. आत्तापर्यंत घेतलेली रक्कम महिला व बालकल्याण विभागाकडे परत केली आहे. यात एक महिला ही जिल्हा परिषदेची सेवानिवृत्त कर्मचारी आहे. या महिलेने सरकारने आवाहन केल्यानंतर आपल्याला ’आता या लाभाची गरज नाही,’ असे सांगून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज दाखल केला.
‘माझ्याकडून नजरचुकीने हा अर्ज केला गेला. मात्र, आता मला या योजनेचा लाभ नको आहे. त्यामुळे माझे नाव त्यातून वगळण्यात यावे’, अशी विनंती या महिलेने केली. त्यानुसार त्या महिलेचा लाभ वगळण्यात आला. विविध तालुक्यांतील आणखी चार महिलांनी स्वतःहून पैसे परत केले आहेत. आत्तापर्यंत योजनेंतर्गत महिलांना सहा-सात महिन्यांचे हप्ते परत केले आहेत, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागातील अधिकार्यांनी दिली.