Published on
:
04 Feb 2025, 4:54 am
Updated on
:
04 Feb 2025, 4:54 am
पालघर : महाराष्ट्र राज्याला ७२० किलोमीटरचा वैभवशाली समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, हवामान बदलासह मानवी कारणांमुळे समुद्रकिनाऱ्यांची धूप होत आहे. त्यामुळे किनारपट्ट्यांतील गावांना धोका निर्माण झाला आहे. किनाऱ्याची झीज झाल्यामुळे समुद्राचे पाणी किनाऱ्यांलगतच्या गावातील घरात शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना वाढत आहेत. तसेच वाळूचा भरमसाठ उपसा होत असल्याने समुद्रकिनारे विद्रूप होत चालले आहेत. किनाऱ्यांची धूप होत असल्याने ग्रामस्थांनी तयार केलेले दगडांचे संरक्षण कवच.
अलीकडच्या काळात समुद्राचे उच्चतम पृथ्वी मंत्रालयाच्या निष्कर्षानुसार... भरती क्षेत्र वाढत चालले आहे. पर्यावरणीय बदल, हवामान बदल, वादळे, नागरिकीकरण, किनाऱ्यांवर वाढत चाललेला मानवी हस्तक्षेप आदी कारणांनी किनाऱ्याची धूप होत आहे. तथापि, काही किनारी जिल्ह्यांच्या क्षेत्रांत बेकायदा वाळू उपशामुळे गंभीर परिणाम आतापासूनच दिसू लागले आहेत. या कारणांनी काही किनाऱ्यांचे तट खचून तटावरील झाडे, वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी, किनाऱ्याचे वैभव असलेल्या सरूच्या बागा -हासाकडे चालल्या आहेत.
विद्रूप किनाऱ्यांकडे पर्यटकांची पाठ
वाळू माफियांचे प्रशासनासोबत आर्थिक हितसंबंध असल्याने बेकायदा वाळू उत्खननावर हव्या तशा कारवाया होत नाहीत. हे आरोप अनेकवेळा गावातील नागरिकांनी केले आहेत. वाळुमाफिया मोठ्या प्रमाणात उत्खनन करत असल्याने किनाऱ्याची विद्रूप अवस्था झाली आहे. किनारी क्षेत्रांत दररोज ठिकठिकाणी खड्डे निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यटक अशा विद्रूप किनाऱ्यांकडे पाठ फिरवत असल्याने किनारी पर्यटनाला काहीसा फटका बसत आहे. शिवाय समुद्री कासवांनाही मोठा फटका बसत आहे.
नियोजन व पुनर्वसन मसुदा धोरणाचे काय?
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) किनारपट्टी आणि नदीची धूप होत असल्याने विस्थापित झालेल्या लोकांसाठी नियोजन व पुनर्वसन मसुदा धोरण तयार केल्याची माहिती तत्कालीन केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली होती. १५ व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापन निधी आणि राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन निधी उभारण्याची शिफारसही केली होती. आयोगाने किनारा झीज रोखण्यासाठी उपाय व किनारी प्रभावित विस्थापित लोकांचे पुनर्वसन यासाठी विशिष्ट शिफारसी केल्या होत्या. मात्र, यावर अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत
चेन्नईच्या संशोधन केंद्राचे धूप होण्यावर लक्ष
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाशी संलग्न असलेल्या चेन्नई येथील राष्ट्रीय तटीय संशोधन केंद्र (एनसीसीआर) यांच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग डेटा आणि जीआयएस मॅपिंग या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून किनारपट्टीच्या धूप होण्यावर लक्ष ठेवले जात आहे.
वाळू उत्खनन : रात्रीस खेळ चाले...
अनेक ठिकाणी किनाऱ्यावर काळोख्या रात्रीच्या व पहाटेच्या वेळी वाळू उत्खनन होते. मुदतबाह्य झालेल्या ट्रक, टेम्पो किंवा पिकअपसारख्या वाहनांनी वाहतूक जोरदार होत आहे. प्रशासन धाडी टाकून कारवाई करण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना आशा प्रकारामुळे मर्यादा येत आहे. त्यामुळे किनारे संवर्धनासाठी ठोस धोरणांची गरज अधोरेखित होत आहे.
पृथ्वी मंत्रालयाच्या निष्कर्षानुसार...
26.9% समुद्री किनाऱ्यांमध्ये वाढ झाली देशात
39.5% किनारे हे स्थिर स्थितीत आहेत देशात
25.5% म्हणजे 188.26 कि.मी. समुद्र किनाऱ्यांची महाराष्ट्रात धूप.
64.6% म्हणजे 477.69 कि.मी. सागरी किनारे महाराष्ट्रात स्थिर
(माहिती 2018 पर्यंतची)