डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क आकारण्याच्या निर्णयावरून यू-टर्न घेतला आहे.(File Photo)
Published on
:
04 Feb 2025, 7:43 am
Updated on
:
04 Feb 2025, 7:43 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडा देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लागू करण्याची घोषणा केली होती. यासोबतच ट्रम्प यांनी चीनलाही झटका देत चिनी उत्पादनांवर अतिरिक्त १० टक्के शुल्कही वाढवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता मेक्सिको आणि कॅनडा या दोन्ही देशांवर कर लागू करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी ३० दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. तथापि, चीनबाबत अमेरिकेने जी भूमिका घेतली आहे ती अजूनही कायम आहे. ते चीनला प्राथमिक आर्थिक धोका मानत असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते.
ट्रम्प यांच्या कर लागू करण्याच्या घोषणेनंतर 'ट्रेड वॉर'ची भीती व्यक्त करण्यात आली होती. यामुळे सोमवारी आशियाई शेअर बाजारात घसरण झाली होती. दरम्यान, ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के कर लागू करण्याचा निर्णय एका महिन्यासाठी पुढे ढकलल्यानंतर बाजारात रिकव्हरी दिसून आली.
अमेरिकेच्या शेजारील दोन्ही देशांनी वाढते स्थलांतर आणि ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा कडक करण्यासाठी पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी सोमवारी मेक्सिको आणि कॅनडावरील कर लादण्याचा निर्णय एक महिन्यासाठी स्थगित केला आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबाम आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी हा निर्णय पुढे ढकलला आहे. याबाबतची माहिती स्वतः ट्रम्प यांनी X वर पोस्ट करत दिली आहे.
ट्रम्प यांनी काय म्हटलंय?
“मी नुकतीच मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबाम यांच्याशी चर्चा केली. "हा एक अतिशय मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संवाद होता. त्यांनी मेक्सिको आणि अमेरिकेदरम्यानच्या सीमेवर १० हजार मेक्सिकन सैनिक तात्काळ तैनात करण्याचे मान्य केले," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
"हे सैनिक विशेषतः फेंटानिलची तस्करी आणि अमेरिकेत होणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यासाठी नियुक्त केले जातील," अशीही ग्वाही त्यांनी दिली असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले.
"कॅनडानेही त्यांची उत्तर सीमा सुरक्षित ठेवण्यास आणि त्यांच्या देशातून होणारी फेंटानिल सारख्या घातक औषधांची तस्करी रोखण्यास सहमती दर्शविली आहे. फेंटानिलमुळे लाखो अमेरिकन लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अमेरिकेतील अनेक कुटुंबे आणि समुदाय उद्ध्वस्त झालेत," असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.