नगर : लहानपणापासूनच मामाच्या घरी राहणारा चेतन रेपाळे कुस्तीचे धडे गिरवत आहे. चेतन चांगला खेळतोय व त्याचा भाऊही चांगला खेळतो. त्यामुळे मामांनी त्यांच्यासाठी कुस्ती संकुल सुरू केले. शिवछत्रपती कुस्ती संकुल नावाची तालीम पारनेर शहरात सुरू झाली. तिथे 2018 पासून चेतन रेपाळे सराव करीत आहे. चेतनने काल झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्यपदकाला गवसणी घातली. कुस्ती क्षेत्रात अहिल्यानगर जिल्ह्यासाठी चेतन रेपाळे उगवता तारा असून, अॅलिम्पिकच्या आशा पल्लवीत करणारा आहे.
पैलवान चेतन रेपाळे त्याचे मामा युवराज पठारे यांच्या पारनेरमधील शिवछत्रपती कुस्ती संकुलमध्ये गेल्या आठ वर्षांपासून कुस्तीचा सराव करत आहे. शालेय स्पर्धा, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धामध्ये सुवर्णपदक, रौप्यपदक पटकावले आहे. 23 वर्षांखालील नॅशनल स्पर्धेतही तो खेळाला आहे. गतवेळी झालेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये 97 किलो वजन गटात त्याने ब्रांझ पदक पटकावले. काल अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी खुल्या गटातून गादी विभागात खेळला. त्याने अकोल्याचा सिद्धांत गवई, सोलापूरचा महेंद्र कांबळे, सोलापूरचा सागर खरात यांना पराभूत केले. उपांत्य सामन्यात डबल महाराष्ट्र शिवराज राक्षे याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. ब्रांझ पदकासाठी त्यांची वाशिमच्या राहुल सूळ यांच्याबरोबर लढत झाली. त्याने राहूल सूळ याचा चार-एक अशा गुणांनी पराभव केला आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ब्रांझ पदकावर नाव कोरले.
चेतनचे पदक अहिल्यानगर जिल्ह्यातील कुस्तीप्रेमी आणि कुस्तीगीरांना प्रेरणादायी ठरणार आहे.