शहरात 76 खासगी रुग्णालयांना नोटीसFile Photo
Published on
:
04 Feb 2025, 7:54 am
Updated on
:
04 Feb 2025, 7:54 am
पुणे: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या सूचनांनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील खासगी रुग्णालयांची विशेष मोहिमेअंतर्गत तपासणी केली जात आहे. आत्तापर्यंत 714 रुग्णालयांची तपासणी केली असून, 76 रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. एक महिन्यात त्रुटी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत शहरात 899 नोंदणीकृत खासगी रुग्णालये आहेत. सहायक आरोग्य अधिकारी, पाच परिमंडल वैद्यकीय अधिकारी, 15 क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तपासणी सुरू केली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार, खासगी रुग्णालयांनी दर्शनी भागात दरपत्रक लावले आहे का, अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र आहे का, जैववैद्यकीय कचर्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का, या निकषांची पाहणी करण्यात येत आहे.
नोटिसा खूप झाल्या; कारवाई कधी होणार?
गेल्या महिनाभरात खासगी रुग्णालयांची तपासणी केली आहे. यामध्ये 76 रुग्णालयांमध्ये नियमांचा भंग होत असल्याचे आढळले आहे. त्यानुसार रुग्णालयांना त्रुटी दूर करण्यासंदर्भात नोटीस बजाविली आहे. त्यासाठी त्यांना तीस दिवसांची मुदत दिली आहे. वर्षभरातून दोनदा होणार्या तपासणीत त्रुटी आढळल्यास केवळ नोटीस बजावली जाते. त्यामुळे ठोस कारवाई कधी होणार, हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे.
शहरात एकूण 899 नोंदणीकृत रुग्णालये असून, त्यांची तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे. नोटीस पाठवलेल्या रुग्णालयांमध्ये मोठी नसून छोटी रुग्णालये आहेत. त्यामध्ये दरपत्रक नसणे, तक्रार निवारण क्रमांक नसणे, रुग्ण हक्क सनद, जैववैद्यकीय कचरा आदी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यानंतर त्यांना नोटीस बजावून सुधारणा करण्यासाठी महिन्याची मुदत दिली आहे.
- डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे