Published on
:
04 Feb 2025, 10:50 am
Updated on
:
04 Feb 2025, 10:50 am
संतोष शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर शिक्षण आणि नोकरीच्या संधींमुळे तरुणाईसाठी आकर्षण केंद्र बनले आहे. मात्र, शेअरिंग फ्लॅट्सच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे एका गंभीर समस्येने डोके वर काढले आहे. काही फ्लॅट्समध्ये रात्रभर बेकायदा पार्ट्या, मद्यधुंद वातावरण, अमली पदार्थांचे सेवन आणि अश्लील कृत्ये सुरू असल्याने स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत.
शहरातील काही शेअरिंग फ्लॅट्समध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आणि अनैतिक कृत्ये होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः हिंजवडी, वाकड, रावेत आणि संत तुकारामनगर भागात अशा पार्ट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या फ्लॅट्समध्ये तरुण-तरुणी राहत असून, काही वेळा तरुणीही अशा पार्ट्यांमध्ये बिनधास्तपणे सहभागी होतात. त्यामुळे सोसायट्यांचे वातावरण दूषित होत असून, रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावर प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
फ्लॅटमालक आणि एजंट यांचा निष्काळजीपणा
पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी फ्लॅट खरेदी करून ते भाड्याने दिले आहेत. मात्र, हे फ्लॅट एजंटांच्या माध्यमातून दिले जात असल्याने फ्लॅटमालक शहराबाहेर राहून संपूर्ण जबाबदारी एजंटवर सोपवतात. परिणामी, या फ्लॅट्समध्ये कोण राहते आणि काय सुरू आहे, याबद्दल फ्लॅटमालक अनभिज्ञ राहतात. त्यामुळे हे फ्लॅट्स बेकायदा कामांसाठी वापरण्यात येत आहेत.
फ्लॅट भाड्याने देताना कडक नियमांची आवश्यकता
फ्लॅटमालकांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये राहणार्या व्यक्तींची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली पाहिजे. तसेच, भाडेकरूंना कडक नियम घालून देणे आणि पोलिस नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. याबाबत पोलिस प्रशासनानेही फ्लॅटमालकांना अधिक मार्गदर्शन करावे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसू शकेल.
कठोर उपाययोजना गरजेच्या
शेअरिंग फ्लॅट्समध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन, पोलिस, सोसायट्या आणि फ्लॅटमालकांनी एकत्रितपणे उपाययोजना करणे गरजेचे आहे.
भाडेकरूंची नोंदणी अनिवार्य करावी
पोलिसांनी फ्लॅटमालकांनी प्रत्येक भाडेकरूची नोंदणी सक्तीची करावी.
सोसायट्यांनी नियम लागू करावेत
संशयास्पद फ्लॅट्सवर लक्ष ठेवण्यासाठी सोसायट्यांनी नियम बनवावेत आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवावेत.
फ्लॅटमालकांनी जबाबदारी घ्यावी
फ्लॅटमालकांनी एजंटांवर संपूर्ण अवलंबून राहण्याऐवजी, फ्लॅटमालकांनी स्वतः फ्लॅटमध्ये कोण राहते, याची खात्री करावी.
पोलिसांनी कारवाई वाढवावी
अशा फ्लॅट्सवर नियमित गस्त ठेवावी आणि संशयास्पद ठिकाणी कठोर कारवाई करावी
पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
या फ्लॅट्समधून होणार्या गैरप्रकारांमुळे सोसायट्यांमध्ये गोंधळ वाढला आहे. समाजातील शिस्त आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर विषय बनला आहे. पोलिसांनी अनेक वेळा भाडेकरू नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, बहुतांश फ्लॅटमालक आणि एजंट हे नियम पाळत नाहीत. त्यामुळे गैरप्रकार रोखण्याचे आव्हान अधिक कठीण बनले आहे.
पार्टी सुरू असताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार
रावेत येथील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या ओल्या पार्टीदरम्यान एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. मुलीने मोबाईलवर मामाच्या मुलाला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यापूर्वी फ्लॅटमध्ये पार्टी सुरू असताना अनेकदा भांडण, हाणामारीदेखील झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.