सुपर स्पेशलिटी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर व नर्सेसच्या टीमने शस्त्रक्रिया करून बाळाच्या पोटातील दोन मृत अर्भक काढले. Pudhari Photo
Published on
:
04 Feb 2025, 1:47 pm
Updated on
:
04 Feb 2025, 1:47 pm
अमरावती : नवजात बाळाच्या पोटात अर्भक असल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली होती. दरम्यान त्या बाळाला अमरावती येथील सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर मंगळवारी (दि.४) यशस्वी शस्त्रक्रिया करून बाळाच्या पोटातील दोन मृत अर्भक काढण्यात आले. ही यशस्वी शस्त्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा म्हणजेच सुपर स्पेशलिटी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर व नर्सेसच्या टीमने केली. दरम्यान बाळाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. शस्त्रक्रियेमध्ये प्रामुख्याने डॉ. उषा गजभिये, डॉ.मंगेश भेंडे, डॉ.नविन चौधरी आदींचा समावेश होता.
संपूर्ण जगामध्ये बाळाच्या पोटात दोन अर्भक असल्याच्या आतापर्यंत ३३ घटना झालेल्या आहेत. त्यामुळे ही घटना कदाचित ३४ वी असावी, असेही यावेळी डॉ.गजभिये यांनी सांगितले. अधिक माहितीनुसार, एका ३२ वर्षीय महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटात साडेचार महिन्यांचा गर्भ असल्याचे निदान काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्हा महिला रुग्णालयात झाले होते. या दुर्मिळ घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या गेले. स्त्री रुग्णालयात शनिवारी (दि.१) सायंकाळी डॉक्टरांनी या महिलेचे यशस्वी सिझर केले. महिलेने मुलास जन्म दिला, बाळ आणि माता दोघांचीही प्रकृती उत्तम होते. दरम्यान त्या बाळाला शस्त्रकियेसाठी अमरावती येथील सुपर स्पेशालिट रूग्णालयात सोमवारी (दि.३) दाखल करण्यात आले. सोनोग्राफी,सिटी स्कॅनसह इतर आवश्यक चाचण्या करण्यात आल्या. येथील वैद्यकिय अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्या बाळावर मंगळवारी (दि.4) शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळाची प्रकृती चांगली असून त्याच्या पोटातील दोन अर्भक काढण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळ घटना
5 लाखांमधून एक आढळणाऱ्या या प्रकाराला वैद्यकीय भाषेत 'फिटस इन फिट्टू' म्हटले जाते. नऊ महिन्यांची गर्भवती असलेली 32 वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. स्त्रीरोगतज्ज्ज्ञ डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी सोनोग्राफी केली असता महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटामध्ये आणखी एक अर्भक असल्याचे निदान झाले. बाळाच्या पोटात साडेचार महिन्यांचे अर्भक होते. निदानानंतर समुपदेशन करत कुठलाही धोका नसल्याचे गर्भवतीस सांगण्यात आले . छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात तिला नेण्याचा सल्ला देण्यात आला होता.
दरम्यान, शनिवारी तिला प्रसववेदना सुरू झाल्याने महिलेस नातेवाइकांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी महिलेस प्रसूती विभागात घेऊन सिझर करण्यात आले. महिलेच्या गर्भात पूर्णतः वाढ झालेल्या बाळाच्या पोटात आणखी एक गर्भ दिसत असल्याने ही केस डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होती. सिझर करून महिला व अर्भक दोघांचाही जीव वाचविण्यात आला. त्याला नवजात शिशू विभागात ठेऊन रात्रभर उपचार करण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्या बाळाला अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय म्हणजेच सुपर स्पेशालिटीत दाखल करण्यात आले होते.
बुलढाण्यातील बाळाला सुपर स्पेशालिटीत दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळाची प्रकृती चांगली असून त्याच्या पोटातील अर्भक काढण्यात आले आहे.
-डॉ.मंगेश मेंढे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी अमरावती