अभिनेता हृतिक रोशनच्या यादीत अनेक मोठे चित्रपट आहेत. सध्या तो ‘वॉर 2’ वर काम करत आहे. मात्र हृतिक रोशनच्या ‘क्रिश’ 4 चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मितीला विलंब होत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे हा चित्रपट रखडून पडला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट कधी रिलीज होईल याची खात्री नसल्याने चाहते नाराज झाले आहेत.
हृतिक रोशनचा ‘क्रिश’ 4 मुळे चाहते नाराज
या वर्षी अनेक मोठे चित्रपट थिएटरमध्ये येणार आहेत. यापैकी एक म्हणजे हृतिक रोशनचा ‘वॉर 2’. या चित्राचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. जिथे ज्युनियर एनटीआर हृतिक रोशनच्या विरुद्ध खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त, तो क्रिश 4 मुळे जास्त चर्चेत आहे. पण चित्रपटाला आता वेळ लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राकेश रोशन यांनी चित्रपट का रखडला आहे याच कारण सांगितलं आहे.
बजेटमुळे ‘क्रिश 4’ ला उशीर?
खरंतर चाहते ‘क्रिश 4’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आली आहे. राकेश रोशन यांनी एका मुलाखतीत चित्रपटाच्या कामाला उशीर का होत आहे याबाबत त्यांनी आर्थिक अडचण असल्याचं सांगितलं आहे.
ते म्हणाले की, “होय मला माहित आहे की लोक खूप दिवसांपासून याची वाट पाहत होते, पण बजेटमुळे गोंधळ होत आहे. आम्ही सिनेमाचं बजेट नीट ठरवू शकलेलो नाही. हा सिनेमा बिग स्केलवर बनवायचा आहे. जर बजेट कमी करण्यासाठी मी सिनेमाची स्केल कमी करेन तर हा एक साधारणच सिनेमा होईल.” अशा पद्धतीने त्यांनी आर्थिक अडचणींमुळे हा चित्रपट रखडला असल्याचं म्हटलं आहे.
“बरीच सावधगिरी बाळगावी लागते…”
ते पुढे म्हणाले, “काळ बदलत चालला आहे. त्यामुळे ‘क्रिश 4’ बनवण्यात अनेक अडचणी येत आहेत. जग छोटं होत चाललं आहे. सध्या लहान मुलं अनेक प्रकारचे सुपरहिरोचे सिनेमे बघतात. अशात छोट्यातल्या छोट्या चुकाही लगेच पकडल्या जातात आणि मग त्यावरुन टीका होते. म्हणून आम्हालाही बरीच सावधगिरी बाळगावी लागणार आहे.” त्यामुळे बजेटप्रमाणेच सिनेमाच्या दृश्यांबाबतही अनेक निर्णय घेण्यात येऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.
कारण नक्कीच धक्कादायक, चाहत्यांची प्रतिक्रिया
अशा पद्धतीने राकेश रोशन चित्रपटाचे बजेट निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे. चित्रपट रखडण्याचं कारण समोर आल्यानंतर मात्र त्यांच्याकडे चित्रपटासाठी पुरेसे बजेट नसल्याचं समजताच चाहत्यांनी मात्र नक्कीच धक्का बसला आहे. आणि चित्रपटाला उशीर लागत असल्यानं नाराजीही व्यक्त केली जात आहे.
बॉलीवूड विरुद्ध हॉलिवूड चित्रपटांचे बजेट
खरंतर, भारतीय चित्रपटसृष्टीतही अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट बनू लागले आहेत. असे अनेक चित्रपट येत आहेत, ज्यांचे बजेट 1000 कोटींच्या जवळपास आहे.
बॉलिवूड विरुद्ध हॉलिवूड सुपरहिरो चित्रपटांच्या बजेटबद्दल राकेश रोशन म्हणाले की, “सध्या आपण त्या पातळीचे चित्रपट बनवू शकत नाही. आम्ही इतका खर्च करू शकत नाही, आपल्याला तेवढं बजेट परवडणारं नाही.” दरम्यान आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या या सिनेमाचं काम कधी सुरू होईल आणि तो कधी प्रदर्शित होईल याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.