जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल, आत्महत्येस प्रवृत्त केले, पाच हजार रुपये दंड
उदगीर (Shinde Shiv Sena) : एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यांनतर मी तुझ्याशी लग्न करणार नाही, माझा नाद सोड नाहीतर तुला व तुझ्या भावाला, वडिलांना खतम करतो अशी धमकी देऊन पीडित मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी उदगीर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. एम. कदम यांनी आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी (Shinde Shiv Sena) शिवसेना शिंदे गटाचा लातूर जिल्हा उपप्रमुख असून तो लातूर जिल्हा डीपीडीसी समितीवर मागच्या काळात सदस्यही होता.
याबाबत सरकारी वकील एस. आय. बिराजदार यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दि. ३ सप्टेंबर २०२० रोजी वाढवणा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी विकास उर्फ कल्याण गोविंदराव जाधव (Shinde Shiv Sena) याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर, मयतास तिच्या घरी जावून आरोपीने मी तुझाशी लग्न करणार नाही, आता माझा नाद सोड, नाहीतर तुला व तुझ्या भावाला आणि तुझ्या वडीलांना खतम करतो, अशी धमकी दिली. तसेच तक्रारदार यास शेतामध्ये जावून, तू आणि तुझ्या पोरीने गावामध्ये माझी बदनामी केलात, असे म्हणून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे फिर्यादीची पीडित मयत मुलगी हिने दि. २ सप्टेंबर २०२० रोजी रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपल्यानंतर विष प्राशन करुन आत्महत्या केली होती.
सुनावणी दरम्यान सरकार पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या साक्षिदारांच्या साक्षिपुराव्यांवर, कागदपत्रावरती व सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर. एम. कदम यांनी आरोपीस कलम ३०६, ५०६ भा. दं. वी. प्रमाणे दहा १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर कलम ३७६, ३७६ (२) (एन) व सहकलम ३ (१), ४.९ (एल), १० बा.लै.अ.प्र.अधिनियम अन्वये ठेवण्यात आलेल्या आरोपातून पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील म्हणून अँड. एस.आय. बिराजदार यांनी काम पाहिले. त्यांना अँड. बी. एन. भालके व कोर्ट पैरवी अधिकारी सपोउपनि आर. पी. शेख यांनी सहकार्य केले. तर जिल्हा सरकारी वकील अँड. एस. व्ही. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी वाढवणा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३०६, ५०४, ५०६ भा. दं. वी. आणि सहकलम ३ (१), ४,९ (एल), १० बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संदीप जोंधळे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. उदगीर येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.
आरोपी शिवसेना शिंदे गटाचा उपजिल्हाप्रमुख
सदरील प्रकरणात आरोपी असलेला (Shinde Shiv Sena) शिवसेना शिंदे गटाचा जिल्हा उपप्रमुख असून, मागच्या काळात शिंदे सरकारमध्ये जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, अशी चर्चा आहे. एका राजकीय नेत्याला १० वर्षे कारावास शिक्षा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राज्य पातळीवरील शिवसेना नेत्यांची याबाबत भूमिका व प्रतिक्रिया कशा येतात, याकडे नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहेत.