टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पार पडलेल्या पाचव्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने विस्फोटक फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. 37 चेंडूमध्ये शतक ठोकत त्याने ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याचबरोबर गोलंदाजी करताना सुद्धा त्याने महत्त्वपूर्ण दोन विकेट घेतल्या होत्या. अभिषेक शर्माच्या या रौद्ररुपाची फुटबॉल प्रेमींमध्येही चर्चा रंगताना दिसत आहे. फुटबॉलची सर्वात मोठी प्रशासकीय संस्था असलेल्या FIFA ने सोशल मीडियावर अभिषेक शर्मासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने वर्चस्व गाजवत 4-1 अशा फरकाने मालिका जिंकली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या पाचव्या टी20 सामन्यात अभिषेक शर्मा इंग्लंडच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला होता. त्याने 54 चेंडूंचा सामना करत 13 खणखणती षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 135 धावा चोपून काढल्या होत्या. अभिषेक शर्माच्या विस्फोटक फलंदाजीचे जगभरातील दिग्गज खेळाडूंनी कौतुक केले. यात आता फिफाचा सुद्धा समावेश झाला आहे. फिफाने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर अभिषेक शर्मा आणि स्पेनचा युवा फुटबॉलपटू लामिन यामल यांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. तसेच उज्ज्वल भविष्य कसे दिसते? अशा स्वरुपाचे कॅप्शन सुद्धा देण्यात आले आहे.