Published on
:
04 Feb 2025, 11:05 am
Updated on
:
04 Feb 2025, 11:05 am
धुळे : शिरपूर शहरात सुमारे चार लाख 11 हजार पाचशे रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. बनावट नोटांचे रॅकेट गुजरात राज्यातून नाशिक जिल्ह्यात तसेच तेथून धुळे जिल्ह्यातील शिरपूर मध्ये आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान अटक केलेल्या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून त्यांचा चौकशीमध्ये आता गुजरात मधील बनावट रॅकेट चालवणाऱ्या म्होरक्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. (Counterfeit notes racket)
शिरपूर येथील खालचे गाव परिसरात काही तरुण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने हालचाली करीत या भागामध्ये पाळत ठेवली. यावेळी त्यांना पुंडलिक ऊर्फ समाधान नथा पदमोर ( रा.हट्टी ता. साक्री) , पिरन सुभाष मोरे ( रा. चांदपूरी ता. शिरपूर) व रंगमल रतिलाल जाधव (रा.अंचाळे ता. साक्री) हे शिरपूर शहरातील खालचे गाव येथे संशयीतरित्या फिरतांना मिळुन आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ असलेल्या सॅक (बॅग) मध्ये 4 लाख 11 हजार 500 रूपयाच्या एकूण 823 बनावट नोटा मिळुन आल्याने त्यांच्याविरूध्द शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असतात त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान अटकेतील आरोपींची पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली. यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
बनावट नोटाच्या बदली मिळणार 20 ते 30 हजार रूपये
आरोपी पुंडलिक ऊर्फ समाधान नथा पदमोर याने सांगितले की, सदरच्या नोटा त्याच्या ओळखीचा इसम नामे गौरव सुकदेव ठोंबरे (रा.मनमाड जि. नाशिक) याने आम्हाला दिलेल्या होत्या व मी तुम्हाला ज्या व्यक्तीला ज्या ठिकाणी जावुन नोटा द्यायच्या आहेत असे तो सांगेल. त्याप्रमाणे सदरच्या नोटा जावुन द्यायच्या आहेत. बदल्यात तो मला 20 ते 30 हजार रूपये देणार होता. म्हणून सदरच्या नोटा त्याने माझ्याकडे व रंगमल जाधव आमच्याकडे दिलेल्या होत्या. अशी माहिती तपासात पुढे आली.
सदर गुन्ह्यात अटक आरोपीतांनी दिलेल्या माहिती वरून गौरव सुकदेव ठोंबरे ( रा. मेसनखेडे खुर्द ता. चांदवड) यास अटक करण्यात आली असुन त्याने सदर गुन्ह्याच्या तपासात माहिती दिलेली आहे की, सदरच्या नोटा या त्याला त्याच्या ओळखीचा इसम राज पटेल रा. भुज (गुजरात) याने दिलेल्या आहेत. सदरच्या नोटा तो ज्या व्यक्तीला सांगेल त्याला त्या द्यायच्या आहेत, असे त्याने सांगितले आहे.