कणकापूर येथील शेतकरी दीपक संजय बच्छाव याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.Pudhari Photo
Published on
:
04 Feb 2025, 1:20 pm
Updated on
:
04 Feb 2025, 1:20 pm
देवळा; पुढारी वृत्तसेवा : कणकापूर येथील शेतकरी दीपक संजय बच्छाव (वय २३) याचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे .या घटनेने कणकापूर सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत देवळा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, कणकापूर येथील प्रगतीशील शेतकरी संजय झापर बच्छाव यांनी दिवसा वीजपुरवठा राहत नसल्याने आपला मुलगा दीपक बच्छाव (वय २३) याला सोमवारी (दि. ३) रात्री १० वाजता आपल्या घराच्या शेतात कांद्याना बारे (पाणी ) देण्यासाठी पाठवले होते. तो रात्री घरी आलाच नाही म्हूणन आई वडील त्याला शेतात शोधण्यासाठी गेले असता मुलगा दीपक विहिरीच्या पाण्यात तरंगताना दिसून आला.
ही घटना समजताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. व मृत दीपकला विहिरीतून बाहेर काढले. यानंतर पोलीस पाटील शिंदे यांनी या घटनेची पोलीस ठाण्यात खबर दिली . पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात नेला. मृत दीपक याच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे . या दुर्दैवी घटनेने कणकापूर, कांचने , खर्डे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांदा लागवड झाली असून, वीजपुरवठा सुरळीत नसल्याने व विजेचे टाईम टेबल चुकीचे असल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागते. त्यात तालुक्यात बिबट्यांचा मुक्त संचार देखील वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणने तालुक्यात दिवसा सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा.
- जगदीश शिंदे, उपसरपंच, कणकापूर, ता. देवळा