भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 6 फेब्रुवारीपासून होत आहे. मालिका सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच संघात बदल करण्यात आला आहे. वरुण चक्रवर्तीची या संघात निवड करण्यात आली आहे. टी20 मालिकेत त्याने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याची निवड करण्यात आली आहे. पण बदल केलेल्या संघात जसप्रीत बुमराहचं नाव कुठेच नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात त्याची निवड केली नव्हती. तिसऱ्या वनडे सामन्यात खेळेल असं सांगण्यात येत होतं. पण त्या आशाही मावळल्या आहेत. कारण नव्या संघात जसप्रीत बुमराहचं नाव नाही. टीम इंडियात जसप्रीत बुमराहचं नाव सब्जेक्ट टू फिटनेस म्हणूनही लिहिलेलं नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
टीम इंडियाच्या निवड समितीतीचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी यापूर्वी टीम इंडिया घोषित करताना बुमराहबाबत मोठी अपडेट दिली होती. अजित आगरकर म्हणाले होते की, ‘बुमराहला पाच आठवडे विश्रांती घ्यायला सांगितलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात तो खेळणार नाही.’ अजित आगरकर यांनी तेव्ह दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात खेळेल असं वाटत होतं. पण आता जाहीर करण्यात आलेल्या टीममध्ये जसप्रीत बुमराहचं कुठेच नाव नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराह वनडे मालिकेला मुकला आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जसप्रीत बुमराहशिवाय भारतीय संघ गोलंदाजीत कमकुवत आहे. दुसरीकडे, मोहम्मद शमीही आताच दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे त्यालाही अजून तसा सूर गवसलेला नाही. जसप्रीत बुमराह बऱ्याच कालावधीपासून पाठदुखीमुळे त्रस्त आहे. यावेळीही त्याला पाठीची दुखापत असून चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळेल की नाही याबाबत शंका आहे. 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होणार आहे. त्यामुळे आता खूपच कमी अवधी शिल्लक आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चिंतेचं वातावरण आहे.