सर्व मुंबईकरांचे लक्ष लागलेला मुंबई महापालिकेचा 2025-206 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. 2025-26 या वर्षासाठीच्या बजेटमध्ये 74 हजार 427.41 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महापालिका बजेटमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या 59 हजार कोटी वरुन यंदाचं बजेट 74 हजार कोटींवर आलं आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा अर्थसंकल्प असून 14.19 टक्के वाढ झालेली आहे. यामध्ये मुंबईकरासांठी अनेक महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या असून आरोग्य विषयक सोयीसुविधांसाठी 7 हजार कोटींची तरतूद , तर शिक्षण सुविधांसाठी 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट काय मिळणार याकडेही अनेकांचं लक्ष लागलं होतं. तर बेस्ट उपक्रमासाठी 1000 कोटींची तरतूद अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
अत्यंत काळजीपूर्वक, परिश्रमानी आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अर्थसंकल्पीय अंदाज तयार केला आहे. प्रत्येक मुंबईकराच जे स्वप्न आहे अपेक्षा आहेत,ते कुठेना कुठे प्रतिबिंबित झालेलं आहे. मुंबईकरांनी पालिकेवर प्रेम आपुलकी विश्वास दाखवला आहे तो विश्वास अधिक दृढ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो,असे पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी नमूद केलं. महसूली वाढ 7 हजार 410 कोटी वाढ झालेली आहे… विविध माध्यमातून ही वाढ झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
महापालिका अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे –
- कचरा गोळा करण्यासाठी पालिकेकडून कर लागू केला जाणार, तुर्तास यावेळी कर नाही मात्र यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणार.
- आरोग्य विषयक सोयीसुविधांसाठी ७ हजार कोटींची तरतूद, शिक्षण सुविधेसाठी 4 हजार कोटींची तरतूद.
- बेस्ट उपक्रमासाठी १००० कोटींची तरतूद अनुदान म्हणून देण्यात येणार.
- मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 1333 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याची अर्थसंकल्पात माहिती. महानगर पालिका उर्वरित काँक्रिटीकरण हे दोन टप्प्यांमध्ये हाती घेणार. यामधील टप्पा एक मधील 75 टक्के कामे आणि टप्पा दोन मधील 50% कामे जून 2025 पूर्वी पूर्ण करण्याची काम प्रस्तावित आहे, यामुळे पावसाळ्यातील खड्डे पडण्याचे समस्येचे प्रमाण कमी होईल असा महानगरपालिकेचा दावा आहे
- दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्प करिता 2025 26 चा अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये 4300 कोटी इतकी तरतूद.
- गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958 कोटी इतकी तरतूद.
- मुंबई महापालिकेचा राखीव निधी (ठेवी ) – 81,774 कोटी
- मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टीतील गाळेधारकांना भरावा लागणार मुंबई महापालिका कर. झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारकांना लागणार कर, झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून सुमारे 350 कोटी इतका महसूल पालिकेला अपेक्षित आहे.
- मुंबई महापालिकेत अडीच लाख झोपडपट्ट्या, त्यातील 20 टक्के झोपडपट्ट्यांमध्ये उद्योगधंदे दुकाने गोदाम हॉटेल्स अशा व्यवसायिक कारणासाठी वापर. या व्यवसायिक गाळेधारकांना कर निर्धारण करून मालमत्ता कर मुंबई महापालिका वसूल करणार. यातून सुमारे 350 कोटी इतका महसूल प्राप्त होणे पालिकेला अपेक्षित आहे.
राणीच्या बागेत विदेशी प्राण्यांची भर
मुंबईत पर्यटनवाढीसाठी महापालिकेने नव्या योजना आखल्या आहेत. राणी बागेचं नवं आकर्षण म्हणून राणी बागेत पेंग्वीन, वाघांनंतर आता जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार आहेत. संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीखालील बोगद्यात वाघाचे शिल्प उभारले जाणार आहे.
तसेच मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटी देण्यात येणार आहेत. लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारले जाणार.काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विरास केला जाणार े.
- मुंबई महानगर पालिकेकडून 2012-13 पासून जानेवारी 2025 पर्यत बेस्ट उपक्रमास 11304.59 कोटी इतक्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे. 2025-26 मध्ये 1000 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे
रस्ते वाहतूक खात्याकरिता
सन ०२५ -२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात ५१०० कोटी तरतूद
मुंबईत प्रकल्पबाधितांकरता सदनिका उभारण्यात येणार.
प्रभादेवी , भांडूप ,मुलुंड, जुहू , मालाड येथील एकूण ३२ हजार ७८२ PAP सदनिकांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या सदनिका पुढील 3 ते 5 वर्षांमध्ये उपलब्ध होतील.
शिक्षण विभागासाठीही तरतूद
मुंबईतील पालिकेच्या विविध वॉर्ड मध्ये CBSC बोर्डाच्या चार शाळा उभारण्यात येणार. नर्सरी ते दहावी पर्यंत मोफत शिक्षण. गेमी फाईड लर्निंग ॲपच्या मदतीने विद्यार्थ्यांना गेमिंग सोबत शिक्षण दिले जाणार ८ वी नववीच्या विद्यार्थ्यांसाठी उपाययोजना. मुंबई महानगरपालिकेच्या शंभर शाळांमध्ये ऑरगॅनिक फार्मिंग किचन गार्डन पद्धतीने मुलांना शेती विषयक धडे दिले जाणार.स्टेम रोबोटिक्स च्या मदतीने मुलांना रोबोटिक्स आणि रोबोट मेकिंग याविषयीचे ज्ञान दिले जाणार याकरता वेगळी प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार.