राहुरी : कायद्याचे रक्षक असलेले खाकी वर्दीतील पोलिस प्रशासनाने कायदा सर्वांना समान असल्याचे वास्तव दाखवून देत, कायदा धाब्यावर बसविणार्या एका खाकी वर्दीवाल्या पोलिस दादाच्या दुचाकीवर कारवाई करीत दंड वसूल करण्यात आल्याने या कारवाईचे कौतुक होत आहे.
घडले असे की, राहुरी पोलिस प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून विना क्रमांकासह फॅन्सी नंबर प्लेट धारक मालकांसह चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलला आहे. यासाठी राहुरी पोलिसांनी रस्त्यावर पथके तैनात करुन, शेकडो दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई केली आहे. हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे. दुचाकी चालकांनी नंबर प्लेट बसवावी, फॅन्सी नंबर प्लेट बसवू नये, असे आवाहन केले होते, परंतू दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई करणारे पोलिस दादाच स्वतःच्या दुचाकीवर ‘दादा’ नावाची फॅन्सी नंबर प्लेट वापरत असल्याची तक्रार राहुरी पोलिस ठाण्यात प्राप्त झाली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी खडबडून जागे होत, वाहतूक पोलिस हवालदार बापू फुलमाळी यांची दुचाकी तपासणीसाठी पोलिस ठाण्यात आणली. दुचाकीवर फॅन्सी नंबर प्लेट असल्याचे दिसताच ठेंगे यांनी कारवाई करण्याचा आदेश दिला. पोलिस हवालदार फुलमाळी यांच्याकडून 1 हजार रुपयांचा दंड वसुल करण्याचा आदेश देण्यात आला. पोलिसांनी पोलिसाकडूनच दंड वसूल करुन, कायदा सर्वांना समान असल्याचे वास्तव दर्शन घडविले.