कोंढव्यात मनसेचे आंदोलन; मुख्य रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणीPudhari
Published on
:
04 Feb 2025, 9:30 am
Updated on
:
04 Feb 2025, 9:30 am
कोंढवा: कोंढवा खुर्द व बुद्रुकला जोडणार्या मुख्य रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे. या रस्त्याचे काम त्वरित सुरू केले नाही, तर मनसे स्टाईलने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोंढवा खुर्द व बुद्रुकला जोडणार्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली कोंढवा वाहतूक शाखेसमोर आंदोलन करण्यात आले, त्या वेळी बाबर बोलत होते. या प्रसंगी मनसेच्या वतीने पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता सिद्धराम पाटील यांना निवेदन देण्यात आले.
सतत नागरिक आणि वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघात होत असून, वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय होत आहे.
या रस्त्यावर मोठी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत महापालिका या रस्त्याचे काम करणार नाही का? प्रशासन जाणीवपूर्वक या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर ही बाब निंदनीय आहे, असे या निवेदनात नमूद केले आहे. वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने या रस्त्याचे काम सुरू करावे; अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे या वेळी बाबर यांनी सांगितले.
या रस्त्याचे काम लवकरच सुरू करून वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यात येईल. अशोका म्यूज ते येवलेवाडी यादरम्यानच्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात येईल.
- सिद्धराम पाटील, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, महापालिका