Published on
:
04 Feb 2025, 11:21 am
Updated on
:
04 Feb 2025, 11:21 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका गुरुवारी, 6 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मोहम्मद शमी या सामन्यात खेळणार हे निश्चित असल्याचे समजते आहे. त्याला एकदिवसीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू मानले जात आहे. तो बऱ्याच काळानंतर वनडेमध्ये पुनरागमन करत आहे. दरम्यान, नागपूरमध्ये खेळल्या जाणा-या या सामन्यात मोहम्मद शमीच्या निशाण्यावर मोठा विश्वविक्रम आहे. हे एक कठीण काम आहे, पण शमी ते करू शकतो. (IND vs ENG ODI Series Mohammed Shami)
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये 200 विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर आहे. स्टार्कने 102 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. तथापि, शमी नागपूरमधील सामन्यात 200 एकदिवसीय विकेट्स पूर्ण करू शकतो परंतु त्याला 5 विकेट्स घ्याव्या लागतील.
जर शमीने नागपूर एकदिवसीय सामन्यात बळींचा पंजा मारला तर तो 101 डावात गोलंदाजी करून 200 बळी घेणारा जगातील सर्वात जलद गोलंदाज बनेल. जर त्याने पुढील दोन सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेतल्या तर तो सामन्यांच्या बाबतीत मिचेल स्टार्कपेक्षा मागे पडेल पण डावांच्या बाबतीत मिचेल स्टार्कची बरोबरी करेल.
शमीने आतापर्यंत खेळलेल्या 101 सामन्यांपैकी 100 डावात 195 एकदिवसीय विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने पाच वेळा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. आता जर तो नागपूरमध्ये सहाव्यांदा पाच विकेट्स घेण्यात यशस्वी झाला तर हाही एक एक विश्वविक्रमही ठरेल.
शमी भारतासाठी सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याच्यानंतर जसप्रीत बुमराहचे नाव येते.
शमीने त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. त्या सामन्यानंतर तो दुखापतीच्या कारणास्तव संघाबाहेर राहिला. त्याने 2024 च्या शेवटी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कठोर परिश्रमाच्या जोरावर कमबॅक केले. त्यानंतर इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका आणि एकदिवसीय मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. तथापि, 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत, शमीला फक्त 2 सामने खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यांमध्ये त्याने 3 विकेट घेतल्या.