कारचालकाचा खून करणारी टोळी जेरबंद; प्रवासाच्या बहाण्याने बसले होते कारमध्येPudhari
Published on
:
04 Feb 2025, 11:18 am
Updated on
:
04 Feb 2025, 11:18 am
पुणे: शेअर कार बुक केल्यानंतर चालकाचाच खून करून त्याचा मृतदेह कसारा घाटात टाकून पसार झालेल्या आंतरजिल्हा दरोडा टाकणार्या टोळीला अखेर आळेफाटा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपींना 7 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
विशाल आनंद चव्हाण (वय 22), मयूर विजय सोळसे (वय 23) आणि ऋतुराज विजय सोनवणे (वय 21) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. तर कारचालक राजेश बाबूराव गायकवाड (वय 56) यांचा आरोपींनी खून केला. 27 जानेवारी रोजी खुनाचा प्रकार समोर आल्यानंतर आळेफाटा पोलिस ठाण्यात राजेश यांचा मुलगा अंकुश गायकवाड (वय 30) याने फिर्याद दिली होती.
कारचालक राजेश गायकवाड हे 27 जानेवारी रोजी त्यांच्या ताब्यातील इर्टिगा कार घेऊन पुण्याला आले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या आईच्या मोबाईलवर एकाने फोन करत त्यांचा मोबाईल पुणे- नाशिक हायवेलगत संतवाडी रोडवर मिळाल्याचे सांगितले.
त्यानंतर शोध घेऊनही राजेश न सापडल्याने 28 जानेवारी रोजी राजेश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. दुसर्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास संतवाडी परिसरात राजेश यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक तपास सुरू केला.
असा लागला खुनाचा छडा
संबंधित कार चाळकवाडी टोलनाक्यावरून नाशिककडे जाताना दिसली. त्यावेळी कारमध्ये राजेश यांच्याव्यतिरिक्त अन्य तीन व्यक्ती बसलेले आढळले. त्यानंतर संबंधित कार कसारा घाटात सापडली.
यामुळे आरोपी नाशिकचे असावेत, अशा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांना बातमीदाराकडून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी कारमधील संबंधित व्यक्ती ही युवराज मोहन शिंदे व विशाल आनंदा चव्हाण असल्याची माहिती मिळाली.
त्यांचा शोध घेत असतानाच पोलिसांना संबंधित आरोपी गुन्हा करण्यासाठी कल्याणकडून ओतूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी माळशेज घाटाजवळ सापळा लावून 31 जानेवारी रोजी विशाल चव्हाण, मयूर सोळसे आणि ऋतुराज सोनवणे यांना पकडले.
आरोपींनी चौकशीत नाशिकला जाण्यासाठी प्रवासी म्हणून कारमध्ये बसलो आणि आळेफाट्याजवळ राजेश गायकवाड यांचा कारमध्येच गळा आवळून खून करून त्यांचा मृतदेह टाकून देत कार घेऊन निघून गेल्याचे सांगितले.
अशा प्रकारे आणखी गंभीर गुन्हे
पुढे त्यांनी या प्रकरणातील फरार आरोपी युवराज मोहन शिंदे याने यापूर्वी देखील त्याच्या अन्य साथीदारांच्या मदतीने अशाप्रकारे गंभीर गुन्हे केले असून, यापूर्वी चाकण परिसरात देखील एक कार जबरदस्तीने चोरून नेली असल्याचे पोलिसांना सांगितले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक रमेश चोपडे, आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, एपीआय अमोल पन्हाळकर यांच्यासह पथकाने केली.
ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा होता प्लॅन
या आरोपींचा गाडी चोरून अहिल्यानगरमधील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्लॅन होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या दरोड्यापूर्वी त्यांना कोणताही गंभीर गुन्हा करायचा नव्हता. मात्र, मारहाणीत राजेश गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने त्यांनी नाशिककडे जाण्याचा पर्याय अवलंबला. संबंधित आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर गंगापूर (नाशिक) मध्ये खून, मालमत्ता चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.