Published on
:
04 Feb 2025, 11:17 am
Updated on
:
04 Feb 2025, 11:17 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट 'अंदाज २' चा टीझर सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला. दिग्दर्शक आणि निर्माता सुनील दर्शन यांनी त्यांच्या आगामी रोमँटिक ड्रामाचा पहिला लूक सोशल मीडियावर प्रदर्शित होत आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपट अंदाजच्या यशानंतर, त्याचा हा सीक्वल आणखी एका सुंदर प्रेमकथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात नव्या कलाकारांना संधी देण्यात आली आहे. आयुष कुमार आणि अकाइशा यांच्या अभिनयाची जादू पाहायला मिळणार आहे. तसेच, नताशा फर्नांडिस एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात परमार्थ सिंग, श्रीकांत मस्की, नीता पांडे, संजय मेहंदीरत्ता, डॉली बिंद्रा, पूजा शर्मा आणि जीतू वर्मा हे सहाय्यक भूमिका साकारत आहेत.
चित्रपटाच्या टीझरमध्ये फायटिंग सीन्सची जबरदस्त दृश्ये, इमोशनल क्षण, अप्रतिम संगीत पाहायला मिळत आहे , जे या चित्रपटाच्या प्रेमकथेची झलक दर्शवतात. टीझरबद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील दर्शन म्हणाले, "प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद बघून मी खूप उत्साही आहे. अंदाजला तेव्हाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि ह्यालाही मिळेल, अशी मी आशा करतो. या चित्रपटात प्रेक्षकांसमोर नवीन शैलीतील प्रेमकथा आणण्याचा प्रयत्न आहे."
अंदाज २ चे संगीत प्रसिद्ध संगीतकार नदीम (नदीम-श्रवण जोडीतील) यांनी दिले आहे. गाण्यांचे बोल समीर यांनी लिहिले असून, गायक अमित मिश्रा, पलक मुच्छल, नीरज श्रीधर, मोहम्मद इरफान, शान, जावेद अली, असीस कौर आणि शादाब फर्दी यांनी आपल्या सुरेल आवाजाने त्यांना सजवले आहे. चित्रपटातील भव्य नृत्य दृश्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर राजू खान यांनी दिग्दर्शित केली आहेत.
श्री कृष्णा इंटरनॅशनलच्या बॅनरखाली तयार होत असलेला अंदाज २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाच्या रिलीज तारखेबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.