मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चोऱ्या दरोडे टाकणारे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत. धनंजय मुंडे या षडयंत्रामध्ये सहभागी आहेत, आम्हाला याची 100 टक्के खात्री आहे. मराठ्यांची गरज संपली, आता पुरावे नष्ट केले जाऊ शकतात, सिडीआर तपासले तर त्यांचे संबंध उघड होतील, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
ज्या मराठा समाजाने मदत केली आहे, असं धनंजय मुंडे म्हणतात, आता त्या समाजाशीच ते गद्दारी करत आहेत. आता मराठ्यांची गरज संपली, त्यावेळी मराठ्यांची गरज होती, ते खोट बोलणारच, पण पाप जास्त दिवस झाकत नसतं. टोळी आतमध्ये जाणार म्हणजे जाणारच. मात्र यांनी जर पुरावे नष्ट केले तर याला पूर्णपणे जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असतील असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अजूनही टोळी सापडत नाही. गेल्या दोन वर्षाचे सीडीआर निघाले पाहिजेत. म्हणजे टोळी कोण चालवत होतं, हे समोर येईल. जात आणि बीड जिल्हा बदनाम झाला आहे. धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत गुंडगिरीला पाठबळ आणि साथ दिली. कारण हेच टोळी चालवत होते. बाकीच्यांना पुढे घालण्यात आलं, मात्र टोळीचा म्होरक्या हाच आहे. भविष्यात पुरावे नष्ट झाले तर याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राहतील, असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
धनंजय मुंडे गुंडगिरी थांबवत नाही, मी त्यांना कितीतरी वेळा सांगितलं टोळी थांबवा, यामुळे तुमचं आणि समाजाचं वाटोळ होईल. पण त्यांना भान राहिले नाही. त्यांना वाटतं टोळी मारा-माऱ्या, भांडण करून आपल्याला पैसे आणून देईल. पण त्यांना हे कळत नाही की यामुळे बीड जिल्ह्याचं किती नुकसान झालं आहे. धनंजय मुंडे हे अजूनही मग्रुरीमध्ये वागत आहेत, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.