बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात सुरुवातीपासूनच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यांच्याकडून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अंजली दमानिया यांच्याकडून सातत्यानं सुरू असलेल्या आरोपांनंतर आज धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दमानिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी दमानिया यांचा उल्लेख ‘बदनामिया’ असा केला, त्यानंतर आता दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या दमानिया?
त्यांनी पीसी घेतली. मला वाटेल ती नावे ठेवली. दमानिया नाही तर बदनामीया नावं ठेवलं. पुराविया ठेवलं असतं तर चाललं असतं. बदनाम लोकांचे मी पुरावे देते, त्यामुळे माझं कोणतंही नाव ठेवलं तरी मला चालेल. मी एक-एक पुरावे काढून तुमची जागा दाखवणार आहे. तुम्ही जेवढा वेळ कराड सोबत होता, त्यापेक्षा एक क्षण तुम्ही मंत्री म्हणून बसला असता तर तुमच्यावर पीसी घ्यायची वेळ आली नसती.
मला अधिकार होता असं मुंडे म्हणतात. १२ एप्रिल २०१८चा जीआर आहे. नवीन वस्तूंचा समावेश करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. वस्तू वगळण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना दिलेला नाही. धनंजय मुंडे यांनी डोळे उघडून बघितलं पाहिजे.
डीबीटीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यासाठी छाननी समिती स्थापन करण्यात आली होती. म्हणजे ही समिती जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत कोणतीही वस्तू डीबीटीच्या बाहेर वगळण्याचा कुणालाही अधिकार नाही. कृषी मंत्र्यांना सुद्धा नाही, मुख्यमंत्र्यांना नाही. अजितदादांनाही नाही. मुख्य सचिवांच्या नेतृत्वात ही समिती होती.
एमएआयडीसी किंवा महाबीज स्वत: उत्पादन करतं. अशाच वस्तू डीबीटीच्या बाहेर राहतील. बाकी उत्पादन न केलेल्या प्रत्येक वस्तू डीबीटी अंतर्गत द्यायच्या असतील तर त्याचे पैसे हस्तांतरण करण्यात यावे अशा सूचना आहेत, हा जीआर आहे. मंत्री म्हणून वेळ दिला असता तर तुम्हाला हे कळलं असतं. बीडमध्ये जाऊन दादागिरी करायची, दमदाटी करायची. मामींची जमीनही बळकवायचे काम केलं आहे, असा हल्लाबोल दमानिया यांनी केला आहे.