ठाणे: पुढारी वृत्तसेवा: एसटी महामंडळाच्या मनमानी भाडे वाढीविरुद्ध राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज (दि.४) ठाणे शहर महाविकास आघाडीतर्फे ठाण्यातील खोपट एसटी डेपो समोर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, धर्मराज्य पक्ष, शेकाप तसेच आप पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
भाजपच्या केंद्रीय व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता प्रचंड महागाईने होरपळली असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. अशातच राज्य सरकारने पंधरा टक्के एसटीची भाडे वाढ करून सर्वसामान्य जनतेचे प्रवास महागडे केले आहे. गरीब प्रवाशांच्या खिश्यातून भाडे वसूल करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आल्याने जनतेत प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे केंद्रीय-राज्य स्तरावरील प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण, आपचे सतिज सलूजा, शेकापचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी, युवक काँग्रेस अध्यक्ष अॅड. आशिष गिरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रम खामकर, शिवसेना कोपरी पाचपाखाडीचे प्रमुख कृष्णा कोळी, शिवसेना महिला आघाडीच्या ज्योती ठाणेकर, महिला काँग्रेस अध्यक्ष स्मिता वैती, प्रदेश प्रतिनिधी रमेश इंदिसे, भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ही एसटी तिकिटावरील दरवाढ त्वरित रद्द व्हावी, या संबंधीचे निवेदन राज्य वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्याच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा एसटी डेपोचे व्यवस्थापक यांना महाविकास आघाडीतर्फे देण्यात आले.