महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाPudhari
Published on
:
04 Feb 2025, 9:27 am
Updated on
:
04 Feb 2025, 9:27 am
नगर : वडील पैलवान... स्वतःचीच तालीम... वडिलांची छत्र हरपले तरी कुस्ती थांबली नाही. आईने लेकरांच्या कुस्तीला पाठबळ दिले. पैलवान मुलांना चांगला आहार मिळावा यासाठी गेल्या पाच वर्षांपासून आई मुलांना घेऊन कोल्हापुरात राहते. त्याच पैलवान मुलांनी अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 92 किलो माती व 97 किलो गादी विभागात सुवर्णपदक पटकावले आणि एकाच वेळी दोन बुलेट घरी नेल्या.
अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत टाकळी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील कालिचरण झुंजार सोलनकर व विश्वचरण झुंजार सोलनकर या बंधूंनी अनुक्रमे 92 किलो माती व 97 किलो गादी विभागात सुवर्णपदकाला गवसणी घातली. दै. पुढारीशी बोलताना पैलवान कालिचरण म्हणाला, लहानपासून कुस्ती खेळ आहे. प्राथमिक शिक्षण गावातच झाले. वडिलांबरोबर गावोगावचे आखाडे खेळत होतो. शालेय स्पर्धाही खेळलो. गावात आमची स्वतःची तालिम आहे. त्यानंतर कोल्हापूरच्या गंगावेस तालीम सराव करू लागलो. गंगावेसमध्ये विश्वास हारगुले, उत्तम पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आतापर्यंत चार वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विविध वजन गटात चार वेळा सुवर्णपदक पटकावले आहे. नॅशनलच्या स्पर्धेत दोन रौप्य व तीन कांस्य पदकावर नाव कोरले आहे.
पाच वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हारपले त्यावेळी कुस्ती थांबले असे वाटले होते. मात्र, माझ्यासह माझ्या लहान भावाच्या कुस्तीला आईने पाठबळ दिले. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही तिघे कोल्हापूरमध्ये राहतो. आमच्या खाण्या-पिण्याची आई काळजी घेते. पहाटे साडेतीन ते आठ व दुपारी साडेतीन ते सहा असा आमच्या व्यायामाचा दिनक्रम आहे. दुपारी थोडीशी विश्रांती घेतो. कुस्तीबरोबर सध्या कोल्हापुरातच आमचे दोघांचेही शिक्षण सुरू आहे. शेतीतून मिळणारा पैसा आणि कोल्हापूर, सोलापूर, सांगली परिसरातील आखाड्यातून मिळणार्या पैशातून खुराकाचा आणि शिक्षणाचा खर्च भागविला जात आहे. आमच्या कुस्तीला आईचे मोठे पाठबळ आहे. त्यामुळेच आम्ही अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागात 97 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले. तर, बंधू विश्वचरण याने माती विभागात 92 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न आहे.