Published on
:
04 Feb 2025, 7:41 am
Updated on
:
04 Feb 2025, 7:41 am
नगर : जिल्हा परिषदेला 15 व्या वित्त आयोगाच्या प्राप्त होणार्या संभाव्य 30 कोटींच्या निधीतून 2025-26 चा विकास आराखडा तयार करण्याची ग्रामपंचायत विभागातून लगबग सुरू झाली आहे. काल या संदर्भात बैठक घेण्यात आली. यात 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व विभागांतून सुचवलेल्या कामांचा सर्वांगिण विकासाचा आराखडा तयार होणार असल्याचे समजते.
15 व्या वित्त आयोगाचा 80 टक्के निधी हा थेट ग्रामपंचायतींना मिळतो, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येक 10-10 टक्के निधी दिला जातो. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक असल्याने 15 व्या वित्त आयोगाचा 10/10 टक्केचा त्यांचा निधी थांबवलेला आहे. आगामी काळात निवडणुका होऊन मागील व चालू असा सुमारे प्रत्येकी 30-30 कोटींचा निधी पंचायत समिती व जिल्हा परिषदेला प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे या निधीतून 2025-26 मध्ये कोणती कामे घ्यायची, याबाबत मार्गदर्शकतत्व घालून दिलेली आहे.
जिल्हा परिषदेचे सीईओ येरेकर यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी काल सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात 15 व्या वित्त आयोगाच्या आराखड्यासंदर्भात सर्व खातेप्रमुख, 14 तालुक्यातील सरपंच, अर्थतज्ज्ञ, स्वच्छता तज्ज्ञ आदिंची बैठक बोलावली होती.
या बैठकीत लांगोरे यांनी शासनाच्या मार्गदर्शनानुसार गरीबी निर्मूलन, स्वच्छ गाव, आरोग्य, प्लास्टीक मुक्ती इत्यादी अशा 17 मुद्द्यांकडे लक्ष वेधून त्याचा आराखड्यात समावेश असावा, अशा सूचना केल्या.यावेळी दादासाहेब गुंजाळ यांनीही 2025-26 या वर्षात बंधित आणि अबंधित याचा विचार करून गरजेची कामे सुचविण्याबाबत विभागप्रमुखांना आवाहन केले. त्यासाठी 15 फेब्रुवारीची मुदत दिल्याचेही समजले. आता शिक्षण, आरोग्यसह जिल्हा परिषदेच्या 16 विभागांतून कामे सुचवली जाणार आहेत. त्याची छाननी केली जाईल व त्यानंतर संबंधित आराखड्याला मंजुरीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचेही समजले.