महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेश सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार अखिलेश यादव यांनी ‘भाजप सरकार चेंगराचेंगरीतील मृतांचा खरा आकडा लपवतेय, असा गंभीर आरोप केला आहे.
संसदेचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बोलताना अखिलेश यादव यांनी भाजप सरकार सडकून टीका केली. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. ”सरकार सध्या आपल्याला बजेटचे मोठे मोठे आकडे दाखवत आहे. मृतांचा आकडा नक्की किती आहे, किती जखमी आहेत. सध्या त्या ठिकाणी उपचाराची काय सोय आहे, डॉक्टर्स, अन्न, वाहतूक या सगळ्याची महाकुंभच्या ठिकाणी कशी सोय आहे हे सगळे संसदेत मांडा. महाकुंभमधल्या डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबरदारी लष्कराकडे द्या, अशी मागणी अखिलेश यादव यांनी संसदेत केली.
”महाकुंभातील त्या घटनेसाठी जबाबदार व्यक्तीवर तसेच खऱी परिस्थिती लपवणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत नक्की किती भाविकांचा मृत्यू झाला खरा आकडा सरकारने सांगावा. राज्यातील हे डबल इंजिन सरकार मृतांचा आकडा का लपवतेय? असा सवालही अखिलेश यादव यांनी यावेळी केला.