चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी राेजी दुबईत रंगणार आहे. (Image source- X)
Published on
:
04 Feb 2025, 10:01 am
Updated on
:
04 Feb 2025, 10:01 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष १९ फेब्रुवारीपासून सुरु होणार्या चॅम्पियन ट्रॉफीकडे ( Champions Trophy 2025 ) वेधले आहे. या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सर्वात 'हाय व्होल्टेज' सामना २३ फेब्रुवारी राेजी दुबईत रंगणार आहे. या सामन्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सामन्याच्या तिकिटांचे बुकिंग सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच सामन्याची तिकिटे संपली.
Champions Trophy : काही मिनिटांत तिकीट बुकिंग फुल्ल
भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्व सामने दुबईत खेळणार आहे. भारताच्या सर्वच सामन्यांसाठी चाहत्यांमध्ये तिकिटांची मोठी मागणी आहे. बहुतेक श्रेणींची तिकिटे विकली गेली आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच एक क्रेझ असते. २३ फेब्रुवारी रोजी होणार्या भारत-पाकिस्तान सामन्यांच्या तिकिटांची विक्री सोमवारी (दि. ३) स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजता किंवा भारतीय वेळेनुसार ५.३० वाजता सुरू झाली. दुबई क्रिकेट स्टेडियमच्या जनरल स्टँड तिकिटांची किंमत १२५ दिरहम (सुमारे ३,००० रुपये) पासून होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याची तिकिटे दुबई येथे होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यानंतर उपलब्ध होणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये घेणार आठ संघ सहभाग
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आठ संघ सहभागी होतील आणि एकूण १५ सामने होतील. भारतीय संघाचे सर्व साखळी सामने दुबईमध्ये खेळवले जातील. तर, उर्वरित संघांचे सामने फक्त पाकिस्तानमध्ये खेळवले जातील. ही स्पर्धा १९ दिवस चालेल आणि १९ फेब्रुवारीपासून सुरू होईल. पाकिस्तानमध्ये रावळपिंडी, लाहोर आणि कराची येथे सामने होतील. पाकिस्तानमधील प्रत्येक मैदानावर तीन गट सामने खेळवले जातील. भारताचा समावेश असलेले तीन गट सामने आणि पहिला उपांत्य सामना दुबईमध्ये खेळवला जाईल.
चॅम्पियन ट्रॉफीमधील पहिला साखळी सामना भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारी रोजी खेळेल. २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामना दुबईत होईल.यानंतर भारतीय संघ २ मार्च रोजी न्यूझीलंडचा सामना करेल. भारतीय क्रिकेट संघाटने महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्त्वाखाली २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यापूर्वी २००२ मध्ये पावसामुळे अंतिम सामना रद्द करण्यात आला. तेव्हा भारत आणि श्रीलंका संयुक्त विजेते होते. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने २०००, २००२, २०१३ आणि २०१७ मध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.