अमेरिकेत सत्ता संभाळताच डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदरित्या अमेरिकेत राहणाऱ्यांना देशाबाहेर काढण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. अमेरिकेत बेकायदरित्या राहणाऱ्या भारतीयांना डिपोर्ट करण्यासाठी अमेरिकेच C-17 प्लेन रवाना झालं आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याने ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशन अजेंडा पूर्ण करण्यासाठी सैन्याची मदत घेतली आहे. त्या अंतर्गत सैन्याने बेकायद प्रवाशांना विमानात बसवून डिपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेने फक्त भारतीय प्रवाशांविरोधात ही कारवाई केलेली नाही, तर मेक्सिकोच्या अवैध प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेवर अतिरिक्त सैनिक पाठवले आहेत. अमेरिकन सैन्याच C-17 विमान भारतीय प्रवाशांना डिपोर्ट करण्यासाठी रवाना झालय, असं एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. पुढच्या 24 तासात हे विमान भारतात पोहोचणार नाही असही त्यांनी सांगितलं.
पेंटागनने दिली विमानं
एल पासो, टेक्सास, सॅन डिएगो आणि कॅलिफोर्निया येथे अमेरिकन अधिकाऱ्यांनी ठेवलेल्या 5 हजार पेक्षा अधिक बेकायद प्रवाशांना डिपोर्ट करण्यासाठी पेंटागनने विमाने उपलब्ध करुन दिली आहेत. या सैन्य विमानातून बेकायद प्रवाशांना ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथे नेण्यात आलय.
या लिस्टमध्ये किती हजार भारतीय?
सत्ता संभाळताच डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदरित्या अमेरिकेत राहणाऱ्यांना देशाबाहेर काढण्याची सर्वात मोठी मोहिम सुरु केली आहे. ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेतून डिपोर्ट करण्यासाठी सरकारी विभागाने 1.5 मिलियन लोकांची लिस्ट बनवली आहे. यात 18 हजार भारतीय आहेत.
हे असं पहिल्यांदा घडेल
प्यू रिसर्च सेंटरच्या आकड्यानुसार भारतातून जवळपास 725,000 भारतीय बेकायदरित्या अमेरिकेत राहतात. मेक्सिको आणि अल साल्वाडोरनंतर बेकायदरित्या अमेरिकेत राहणाऱ्यांची ही मोठी संख्या आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता संभाळल्यानंतर पहिल्यांदा अवैधरित्या राहणाऱ्या भारतीयांना मायदेशात डिपोर्ट केलं जाईल. ट्रम्प आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये अमेरिकेत बेकायदरित्या राहणाऱ्या भारतीयांच्या मुद्यावर चर्चा केली होती. मोदी यांच्याशी बोलणं झाल्यानंतर ट्रम्प यांनी इमिग्रेशन संदर्भात भारतीय पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्याच सांगितलं होतं.